गाढव काय करू शकतं? नांदेडच्या दूधाचा भाव पहा, 10 थेंबांची किंमत सोन्यालाही लाजवणारी….
विशेषतः लहान बालकांच्या सगळ्या आजारात हे दूध प्रभावी ठरत असा अनेकांचा अनुभव आहे.
नांदेडः माणसांनी एखाद्या प्राण्यावर बदनामीचा शिक्का मारला की तो वर्षानुवर्षांपासून तो शिक्का तसाच राहतो. गाढव (Donkey), कावळा हे यातलेच प्राणी. पण निसर्गानं या प्राण्यांमध्ये उपजलेली वैशिष्ट्ये दुर्लक्षून चालणार नाही. गाढवांच्या बाबतीतही तसंच आहे. गाढविणीच्या दुधाची (Donkey Milk) किंमत वाचायला जाल तर थक्क व्हाल…. सोन्याच्या किंमतीलाही लाजवणारे दर आहेत…
गाढविणीच्या दुधाच्या 10 थेंबांची किंमत आहे 300 रुपये. तुम्ही म्हणाल, थेंब थेंब कोण मोजत बसणार? पण ते थेंबा-थेंबानेत साठवलं जातं. विकतंही थेंबाच्याच दरात…
नांदेडच्या गल्ल्यांत फिरणारे हे दादा पाहिले. त्यांच्यासोबत गाढवीण. गाढविणीचं दूध विकायला ते निघाले, पण हातात किटली वगैरे काही नाही. एक माईक, त्यावर ते या दुधाचं महत्त्व सांगतात.
आयुर्वेदात गाढविणीच्या दुधाचे खूप फायदे सांगितले आहेत. इतर दुधाच्या तुलनेत गाढविणीच्या दुधात रोगप्रतिकारक शक्ती अधिकची असते. तसेच असंख्य आजारावर रामबाण उपाय म्हणून या दुधाला आयुर्वेदिक उपचार प्रणालीत मान्यता आहे.
विशेषतः लहान बालकांच्या सगळ्या आजारात हे दूध प्रभावी ठरत असा अनेकांचा अनुभव आहे. कफ, न्युमोनिय, सर्दी, खोकला, ताप होत नाही, असे म्हटले जाते. लहान मुलाला हे दूध दिल्यास त्याचे लाभ जन्मभर मिळतात, असेही म्हटले जाते.
नांदेडमध्ये फिरणाऱ्या या दादांनी विक्री करताना सोबत एक माप ठेवलंय. या मापात 10 थेंब गाढविणीचं दूध घेतलं जातं. ताजं ताजं दूध तिथेच प्यायला देतात. लहान मुलांना तीन माप तर मोठ्या माणसांना पाच माप.. असा याचा खुराक दिला जातो, असं या फेरीवाल्यांनी सागितलं. एका मापाची किंमत 300 रुपये.
एक लीटर दुधाची किंमत 12 हजार रुपये एवढी आहे. पण गाढवाचं एक लीटर दूध मिळणंही फार कठीण असतं. 10-12 गाढविणींचं काढलं तरीही ते एक लीटरभर होत नाही. जवळपास 20 गाढविणींचं काढलं तर लीटरभर दूध मिळतं… कर्नाटक भागात या दुधाला जास्त भाव असल्याचं या फेरीवाल्यांनी सांगितलं.