Noise pollution : तरुण बहिरे होणार? जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
ध्वनी प्रदूषणाचे आरोग्यावर काय परिणाम होतात. यावर जागतिक आरोग्य संघटनेनं भाष्य केलंय.
नवी दिल्ली : भारतात ध्वनी प्रदूषणाची (Noise pollution level) पातळी सातत्याने वाढत चालली आहे. नॅशनल पार्क सर्व्हिसच्या नॅचरल साउंड अहवालानुसार, दर तीस वर्षांनी ध्वनी प्रदूषणामध्ये तिप्पट वाढ होत आहे. कोविडच्या (covid) काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्या काळात हे प्रदूषण लक्षणीयरित्या कमी झालं होतं. मात्र गेल्या दीड वर्षांपासून पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती झाली आहे. ध्वनी प्रदूषणावर शास्त्रज्ञांनी संशोधनही (research) केलं असून त्यात असं आढळून आलं आहे की, ध्वनी प्रदूषणामुळे मेंदूमध्ये (brain) अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलचे प्राध्यापक इम्क कॅस्ट्रे यांनी वेगवेगळ्या आवाजांबाबत संशोधन केले आहे. आवाजाची पातळी जेवढी वाढेल, तेवढी आपली ऐकण्याची क्षमता कमकुवत होईल आणि त्यामुळे मानसिक ताणही येईल. तर शांत वातावरण असल्यास शरीराला खूप छान वाटतं.
अति गोंगाटामुळे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अधिक ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. सतत आवाज वाढल्याने ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तसेच व्यक्तीला नैराश्य येण्याचाही धोका असतो.
तरुणांच्या श्रवणशक्तीवर होत आहे गंभीर परिणाम –
जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे भारतातील तरुणांची श्रवणशक्ती कमी होत आहे. भारतात श्रवणयंत्राची गरजही वाढली आहे. गाड्यांचे हॉर्न आणि तारस्वरातील गाणी, संगीत हे ध्वनी प्रदूषण वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे.
ज्या लोकांची श्रवण क्षमता आधीच कमी आहे, त्यांच्यावरही याचा परिणाम होत असून त्या व्यक्तींनाही (ध्वनी प्रदूषणाचा) याचा फटका बसत आहे. अशा लोकांच्या समस्येत आणखी वाढ होत आहे. मेट्रो शहरांमध्ये ही समस्या अधिक वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटने (WHO) नुसार, जगभरात सुमारे दीड अब्ज लोकांची श्रवण क्षमता कमी आहे आणि ध्वनी प्रदूषणामुळे ही समस्या झपाट्याने वाढत आहे.
2030 सालापर्यंत ऐकण्याची क्षमता कमी असणाऱ्या व्यक्तींची संख्या 13 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हे प्रदूषण रोखण्यासाठी वेळीच कठोर पावले उचलली नाहीतर येत्या काळात ही मोठी समस्या बनू शकते.
उपचार करणाऱ्यांची संख्या खूप कमी –
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात 10 पैकी केवळ 2 लोक ऐकण्याच्या समस्येसंदर्भात उपचार घेतात. इतर लोक या त्रासासह जगतात. ग्रामीण भागात अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे.