हेल्दी की अनहेल्दी ? तुमची ‘जीभ’ सांगू शकते कसं आहे तुमचे आरोग्य ?
आपल्या जीभेचा रंग कसा आहे, यावरून आपल्या आरोग्याविषयी माहिती कळू शकते. डॉक्टरही आपली जीभ पाहून प्रकृतीचा अंदाज लावू शकतात.
नवी दिल्ली : आपण काय खातो-पितो यावर आपलं आरोग्य (health) आणि आयुष्य हे दोन्ही कसं असेल हे ठरतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर परिणाम करणाऱ्या अनेक रोगांची लक्षणे जिभेवर (tongue) अनेकदा दिसतात. जेव्हा बरं नसताना एखादी व्यक्ती किंवा रुग्ण तपासणीसाठी दवाखान्यात जातो, तेव्हा डॉक्टर त्यांना प्रथम त्यांची जीभ दाखवण्यास सांगतात. कारण जीभेवरून आरोग्याच्या अनेक समस्यांचा अंदाज येऊ शकतो.जिभेच्या रंगात होणारे (tongue color) बदल पाहून डॉक्टरांना तुमची प्रकृती ठीक आहे की नाही आणि तुमची समस्या काय आहे याची कल्पना येऊ शकते. आपल्या आरोग्याशी संबंधित अशी कोणती रहस्ये आहेत जी जीभ उघड करू शकते, ते जाणून घेऊया.
जीभ उघड करू शकते अनेक रहस्य :
1) बर्निंग माउथ सिंड्रोम
ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये जीभ आणि टाळूसह संपूर्ण तोंडात जळजळ जाणवते. त्यामुळे घसा दुखणे आणि चव बदलण्याची समस्या उद्भवते.
2) तोंडात पांढरे डाग येणे
जिभेवर पांढरे डाग दिसणे हे यीस्ट संसर्गाचे लक्षण असू शकते. ही समस्या सामान्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये अधिक दिसून येते. जिभेवर पांढरे डाग हे ल्युकोप्लाकियाच्या समस्येचे देखील संकेत देतात. बहुतेक ल्युकोप्लाकिया पॅचेस कर्करोगाचे नसतात. जरी काही पॅचेस हे कर्करोगाच्या प्रारंभाची चिन्हे असू शकतात. तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या अधिक वाढते.
3) जीभेवर केस
अनेक लोकांच्या जिभेवर एक काळा जाड थर तयार होतो आणि त्यावर केस वाढण्यासारख्या समस्याही दिसतात. या आजाराला ब्लॅक हेअरी टंग सिंड्रोम म्हणतात. ब्लॅक हेअरी टंग सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे. जेव्हा त्वचेवर मृत पेशी येऊ लागतात तेव्हा असे होते. त्यामुळे जिभेवर काळा जाड थर तयार होतो.
4) काळी जीभ
अँटासिड गोळ्या घेणारे लोक आणि मधुमेहाच्या रुग्णांना हा त्रास होऊ शकतो. या गोळ्यांमध्ये बिस्मथ धातू असते. हा धातू सल्फरसह एकत्रित होतो, जे तोंडात आणि पचनमार्गात असते. या दोन्हींच्या मिश्रणामुळे जीभ काही वेळा काळी पडते. योग्य उपचाराने ही समस्या बरी होऊ शकते.
5) जीभ लाल होणे
जीभ लाल होणे हे कावासाकी रोगाचे लक्षण असू शकते. या रोगामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अतिशय जळजळ होते आणि संपूर्ण शरीरात रक्तवहिन्यासंबंधीचा दाह होतो. बहुतेक 1 ते 5 या वयोगटातील मुलं कावासाकी रोगाने ग्रस्त होऊ शकतात. तथापि, हा रोग लहान व मोठी मुलं यांच्यासह किशोरवयीन मुलांवर परिणाम करू शकतो. स्कार्लेट तापाच्या रुग्णांमध्येही लाल जीभेची समस्या अनेकदा दिसून येते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)