High Cholesterol : काम करताना हात सतत दुखतो? हे असू शकते वाढत्या कोलेस्ट्रॉलचे लक्षण
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याचे फारसे संकेत मिळत नसले तरी शरीरातील काही बदलांकडे नीट लक्ष दिल्यास हाय कोलेस्ट्रॉलची जाणीव होऊ शकते.
मुंबई : शरीरातील कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol) पातळी वाढल्यास हृदयविकाराचा (Heart Disease) धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास हृदयासंबंधित विकार आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका जास्त वाढतो. त्याशिवाय ग्लोबल हेल्थ एजन्सीच्या सांगण्यानुसार, जगातील एक-तृतीयांश नागरिकांना शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा सामना कराव लागतो. हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही लक्षणे शरीरात आढळून येत नसल्याने, त्याचे प्रमाण कळणे कठीण होते आणि त्यामुळेच हाय कोलेस्ट्रॉलला ‘सायलंट किलर’ म्हटले जाते. चांगले एचडीएल (Good)आणि घातक एलडीएल (Bad)असे कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल , असे त्याचे वर्गीकरण होते. LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी घातक असते. ते वाढल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये फॅट (चरबी) जमा होऊ शकते. जसजसे फॅटचे प्रमाण वाढते, तसा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. क्वचित हे फॅट तुटल्यास रक्ताची गुठळी तयार होऊ शकते व त्यामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असल्यास त्याची काही लक्षणं दिसत नाहीत. मात्र शरीरातील काही बदलांकडे नीट लक्ष दिल्यास हाय कोलेस्ट्रॉलची जाणीव होऊ शकते.
दंडामध्ये वेदना होत असल्यास त्वरित लक्ष द्या –
शरीराल कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखणे, अत्यंत महत्वाचे असते. अन्यथा धमन्यांमध्ये चरबी जमा होऊ शकतो, ज्यामुळे हाता-पायाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. या स्थितीला पेरीफेरल आर्टरी डिसीज (PAD) म्हटले जाते. यामुळे तुमच्या हाता-पायांमध्ये खूप वेदना होऊ शकतात.
कोणतेही काम करताना हात अथवा पायात खूप वेदना होत असतील, तर ते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याचे लक्षण आहे. त्यावर वेळेत उपचार न केल्यास कोणतेही काम करताना क्रॅम्प्स सहन करावे लागू शकतात. यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, बऱ्याच वेळा हाता-पायांत येणारे क्रॅम्प्स हे कमी वेदनादायी असतात, मात्र क्वचित त्यांची तीव्रता वाढू शकते.
पेरीफेरल आर्टरी डिसीज म्हणजे काय ?
पेरीफेरल आर्टरी डिसीज (PAD) हा एक असा आजार आहे ज्यामध्ये तुमचे डोके, अवयव आणि पायापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचू शकते. ही एक सर्क्युलेटरी समस्या असून त्यामध्ये धमन्या अतिशय बारीक होतात व हाता-पायाला नट रक्तप्रवाह होत नाही.
हातातील वेदना केवळ हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण नव्हे –
हाय कोलेस्ट्रॉलशिवाय हातात वेदना होण्याची आणखीही अनेक कारणे असू शकतात. दंड व खांदे यामध्ये वेदना होत असल्यास, ते हृद्यविकाराच्या झटक्याचे लक्षणही असू शकते. त्याशिवाय स्ट्रेचिंग किंवा काही लागल्यामुळेही या वेदना होऊ शकतात.
या लक्षणांकडेही द्या लक्ष –
- पेरीफेरल आर्टरी डिसीजची (PAD) आणखीही काही लक्षणे असू शकतात.
- – पाय सुन्न पडणे आणि त्यातील ताकद निघून गेल्यासारखे वाटणे.
- – पायांवरील केस गळणे
- – पायाची नखं सहज तुटणे व त्यांची वाढ हळू होणे.
- – पायांचा रंग बदलून ते पिवळा वा निळ्या रंगाचे होणे.
- – नपुंसकता
या कारणामुळे वाढतो हाय कोलेस्ट्रॉलचा धोका –
शरीरात अनहेल्दी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे, जाडेपणा, शारीरिक हालचाल न करणे, धूम्रपाम आणि मद्यपान, या घातक सवयींमुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.