तुमची अंडरवेअर आणू शकते पिता बनण्याच्या स्वप्नात अडथळा, पॉलिस्टर अंडरवेअरमुळे प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम ?
बहुतांश लोक हे पॉलिस्टर अंडरवेअर घालणे पसंत करतात, मात्र त्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पॉलिस्टर अंडरवेअरमुळे महिलांमध्ये देखील वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.
नवी दिल्ली : ज्याप्रमाणे आपण काय खातो याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, तसाच आपण कोणते कपडे, त्यासाठी कोणतं कापड वापरतो याचाही आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. शरीरावरील कपड्यांप्रमाणेच अंतर्वस्त्र अथवा अंडरवेअर (underwear) कोणती घालावीत ही लोकांची वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाला त्यांच्या कम्फर्टप्रमाणे अंडरवेअर घालण्याची इच्छा असते पण पॉलिस्टर अंडरवेअरचा तुमच्या आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? हे लगेच कळत नसले तरी पॉलिस्टर अंडरवेअर (Polyester underwear) जास्त काळ वापरल्याने पुरुषांमध्ये नपुंसकता (impotency) आणि महिलांमध्ये वंध्यत्वाची (infertility)समस्या वाढू शकते.
पॉलिस्टरला पॉलिथिलीन टेरेफ्थालेट म्हणजेच पीईटी (polyethylene terephthalate PET) असे म्हटले जाते. हे सिंथेटिक अथवा मनुष्य-निर्मित फायबर मटेरिअल असून कोळसा, तेल, पाणी यासह अनेक घटकांचा वापर करून ते बनवले जाते.
बायोहॅकर टीम ग्रेच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की पॉलिस्टर अंडरवेअर पुरुष आणि महिला दोघांनाही हानी पोहोचवते. पॉलिस्टर कपड्यांमुळे महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढते. हे मानव-निर्मित कापड महिला व पुरुष दोघांसाठीही अतिशय घातक आहे.
महिलांमध्ये वंध्यत्व आणि गर्भपाताची समस्या
टीम ग्रेने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला असून प्रजननक्षम वयातील स्त्री-पुरुषांनी पॉलिस्टर अजिबात वापरू नये, असे त्यामध्ये आवर्जून नमूद करण्यात आले आहे. पॉलिस्टर अंडरवेअर घातल्याने वंध्यत्व, गर्भपात, वंध्यत्व आणि नपुंसकत्व येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. पॉलिस्टर घातल्यानंतर, प्रजनन अवयवांच्या आसपासच्या त्वचेला श्वास घेण्यास त्रास होतो, असे या व्हिडीओमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचा प्रजनन कार्यावर परिणाम होतो. ग्रे यांनी 1992 च्या ब्रिटिश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या अभ्यासाचा दाखला देत सांगितले आहे की, पॉलिस्टर हे पुरुषांसाठी खरोखर गर्भनिरोधक म्हणून 100 टक्के काम करते.
या संदर्भात 14 पुरुषांवर 12 महिने करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, जेव्हा निरोगी पुरुषांनी वर्षभर पॉलिस्टर अंडरवेअर वापरली, तेव्हा त्यांना वर्षभराच्या आतच ॲझोस्पर्मिया विकसित झाला. ॲझोस्पर्मियामध्ये पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या शून्यापर्यंत पोहोचते. पॉलिस्टर अंडरवेअर घातल्याने पुनरुत्पादक अवयवांभोवती इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तयार होते ज्यामुळे शुक्राणूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे आतील तापमानात अडथळा येतो.
टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनामध्येही निर्माण होतो अडथळा
याबाबत आणखी एक अभ्यास केल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले. या अभ्यासात, संशोधकांनी 24 कुत्र्यांवर एक अभ्यास केला ज्यामध्ये निम्म्या कुत्र्यांनी पॉलिस्टरचे कपडे घातले होते आणि निम्म्या कु्त्र्यांनी असे कपडे घातले नव्हते. 24 महिन्यांनी असे आढळून आले की इतका काळ पॉलिस्टरचे कपडे वापरणाऱ्या कुत्र्यांना ॲझोस्पर्मिया रोग झाला. म्हणजेच या कुत्र्यांमध्ये शुक्राणूंची संख्या शून्य झाली. यामुळे कुत्र्यांमध्ये शुक्राणू निर्माण करणाऱ्या सेमिनिफेरस ग्रंथींच्या पेशींचा क्षय होऊ लागला, असेही त्यांनी नमूद केले.
पॉलिस्टरचा वापर केल्याने टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनात अडथळा येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी नमूद केले. यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज तयार होतो ज्यामुळे शुक्राणूंची संख्या अचानक कमी होते. एवढेच नाही तर पॉलिस्टर अंडरवेअरमुळे झोपेतही त्रास होऊ शकतो आणि किडनीच्या आजाराचा धोकाही वाढू शकतो.
मग अशावेळी काय करावे ?
आतापर्यंत केलेल्या अभ्यासांना मर्यादा आहेत आणि मानवी आरोग्यावर पॉलिस्टरचे संभाव्य परिणाम पूर्णपणे समजून घेण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे तज्ज्ञांनी नमूद केले. यादरम्यान, ज्या व्यक्ती पॉलिस्टरचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर आणि एकूण आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंतित आहेत, त्यांनी नैसर्गिक साहित्यापासून बनवलेले कपडे घालण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.