Poonam Pandey death : पूनम पांडे हिचा ज्या आजाराने मृत्यू झाला, तो सर्व्हिकल कॅन्सर किती धोकादायक?, काय आहेत लक्षणे?
सर्व्हिकल कॅन्सर हा महिलांमध्ये होणारा दुसरा सर्वात गंभीर कॅन्सर आहे. वयाच्या 35 व्या वर्षानंतर या आजाराचा धोका फार वाढतो. अशा परिस्थितीत या आजाराबद्दल जागरुकता वाढावी यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात सर्व्हिकल कॅन्सर अवेअरनेस मंथ साजरा केला जातो.
मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या तिने अखेरचा श्वास घेतला. सर्व्हिकल (गर्भाशयाच्या) कॅन्सर मुळे तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्वाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे’, असं त्यात लिहिलं आहे. या वृत्तामुळे एकच खळबळ माजली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तिचा ज्या आजारामुळे मृत्यू झाला, तो सर्व्हिकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय, तो किती धोकादायक असतो, त्याची लक्षणे काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सर्व्हिकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) हा (Cervical Cancer) स्त्रियांमधील सर्वात गंभीर कॅन्सरपैकी एक आहे. ब्रेस्ट कॅन्सरनंतर (breast cancer) भारतात महिलांना (women) या आजाराचा सर्वाधिक त्रास होतो. हा एक गंभीर प्रकारचा कॅन्सर आहे, जो सर्व्हिक्समध्ये होतो. खरंतर, स्त्रियांचे गर्भाशय आणि योनीला जोडणाऱ्या भागाला ग्रीवा म्हणतात. या सर्व्हिक्समध्ये होणाऱ्या कॅन्सरला सर्व्हिकल कॅन्सर असे म्हणतात.
अनेकदा 35 ते 40 व्या वर्षानंतर महिलांची मासिक पाळी अनियमित होऊ लागते. कधीकधी त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागतो. मात्र हे सामान्य आहे, असे समजून बऱ्याच महिला त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ही सर्व्हिकल कॅन्सरची सुरूवात असू शकते.
सर्व्हिकल कॅन्सर हा अत्यंत धोकादायक मानला जातो, कारण सर्व्हिकल पासून सुरू होणारा हा कॅन्सर यकृत, ब्लॅडर, , योनी, फुफ्फुस आणि मूत्रपिंडात पसरू शकतो. अशा परिस्थितीत या कॅन्सरची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत आवश्यक ठरते. मात्र या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही जागरुकतेचा अभाव आहे. अशा परिस्थितीत या गंभीर आजाराबद्दल जागरुकता वाढावी यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात सर्व्हिकल कॅन्सर अवेअरनेस मंथ साजरा केला जातो.
ही आहेत लक्षणे –
– वारंवार लघवी लागणे
– पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे
– छातीत जळजळ होणे व लूज मोशन
– अनियमित मासिक पाळी
– भूक न लागणे किंवा खूप कमी खाणे
– खूप जास्त थकवा जाणवणे
– ओटीपोटात वेदना होणे किंवा सूज येणे
– बऱ्याच वेळेस थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे
– शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे
– मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे
सर्व्हिकल कॅन्सरचे कारण
एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्व्हिकल कॅन्सरची समस्या दिसून येते. त्याशिवाय आनुवंशिकता हेही याचे प्रमुख कारण आहे. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की कौटुंबिक इतिहासामुळे महिलांमध्ये सर्व्हिकल कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सिगारेटमध्ये असलेले निकोटीन देखील याचे कारण बनू शकते. तसेच वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव किंवा कुपोषणामुळेही सर्व्हिकल कॅन्सर होऊ शकतो.
या गोष्टींची घ्या काळजी
– जर तुम्हाला सर्व्हिकल कॅन्सरपासून वाचयचे असेल, तर नियमितपणे पॅप चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे.
– तंबाखू किंवा त्याच्या उत्पादनांचे, सिगरेटचे सेवन केल्यानेही सर्व्हिकल कॅन्सर होऊ शकतो. अशा परिस्थितीत या जीवघेण्या आजारापासून वाचायचे असेल तर आजच धूम्रपान करणे सोडावे.
– सर्व्हिकल कॅन्सर अनेक प्रकारच्या एचपीव्हीमुळे होतो. अशा परिस्थितीत, एचपीव्हीपासून संरक्षणासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे ठरते.
– सुरक्षित शारीरिक संबंध महत्वाचे ठरतात, यामुळे सर्व्हिकल कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)