कमी पाणी पिणाऱ्या व्यक्ती लवकर होतात वृद्ध – संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या प्रौढ व्यक्ती पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहतात, त्या व्यक्ती कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त काळ जगतात.
न्यूयॉर्क – आपल्या शरीरासाठी पाणी (water) किती महत्वपूर्ण आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आता एका नव्या संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, जे लोक व्यवस्थित (पुरेसे) पाणी पीत नाहीत ते लवकर वृद्ध होण्याचा (early aging) आणि (त्यांचा) वेळेपूर्वीच मृत्यू होण्याचा धोका असतो. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या (National Institute of Health) नव्या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, पुरेशा प्रमाणात पाणी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत पुरेसे हायड्रेटेड न राहणाऱ्या (पुरेसे पाणी न पिणारे) लोकांना (dehydration) लवकर वृद्धत्व येण्याचा आणि जुनाट आजारांचा धोका अधिक असतो.
एनआयएचच्या अभ्यासाचे सोमवारी प्रकाशित झालेले हे निष्कर्ष 25 वर्षांत अमेरिकेतील 11,000 हून अधिक लोकांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहेत. या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींची प्रथम 45 ते 66 या वयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर 70 से 90 या वयोगटात फॉलो-अप चाचणी करण्यात आली होती.
कमी पाणी पिण्याचा धोका काय ?
संशोधकांनी यातील सहभागींच्या रक्तातील सोडिअमच्या पातळीकडे हायड्रेशनसाठी प्रॉक्सी म्हणून पाहिले. खरं तर, एखादी व्यक्ती जितकी कमी द्रवपदार्थ सेवन करते, तितके जास्त सोडिअम त्या व्यक्तीच्या रक्तात आढळते. अशा परिस्थितीत, संशोधकांना असे आढळून आले की ज्या व्यक्तींच्या रक्तात सोडिअमचे प्रमाण जास्त होते, ते (रक्तात) कमी सोडिअम पातळी असलेल्या व्यक्तींपेक्षा (शारीरिकदृष्ट्या) लवकर वृद्ध होतात. तसेच त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर असे वृद्धापकाळाशी संबंधित आजार असल्याचेही आढळून आले.
ज्या लोकांच्या रक्तात सोडिअमचे प्रमाण 142 मिलीमोल प्रति लिटरपेक्षा जास्त होते त्यांना हार्ट फेल्युअर, स्ट्रोक, फुफ्फुसाचे आजार, मधुमेह आणि स्मृतिभ्रंश यासह काही जुनाट आजार होण्याचा धोका अधिक वाढतो असेही या अभ्यासात आढळून आले.
कमी पाणी प्यायल्यामुळे काय धोका उद्भवतो हे तर या अभ्यासात दिसून आले, पण जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने हे आजार रोखता येतील, असे यातून सिद्ध झालेले नाही, असे एनआयएचने सांगितले.
डिहायड्रेशन ही सामान्य समस्या नव्हे
योग्य प्रमाणात पाणी पिणे म्हणजेच हायड्रेटेड राहणे याच्या फायद्याबद्दल सांगायचे झाले तर त्यामुळे सांधेदुखी दूर होते तसेच शरीराचे तापमान सामान्य राखण्यास मदत होते. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठता अथवा किडनी स्टोनपासूनही बचाव होऊ शकतो. मात्र एखादी व्यक्ती पुरेसे पाणी पीत नसेल आणि त्याऐवजी गोड पेयांचे सेवन करत असेल तर त्या व्यक्तीला मूत्रमार्गात संसर्ग आणि किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.
खरंतर महिलांनी दररोज किमान 2 लिटर आणि पुरूषांनी किमान 3 लिटर पाणी अथवा द्रव पदार्थांचे सेवन करावे, अशी शिफारस डॉक्टर करतात. मात्र हालचाल आणि बाहेरील वातावरणानुसार, वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या पाण्याची गरजही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ – उष्ण आणि दमट वातावरणात मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त पाणी पिण्याची गरज असते.