प्रेग्नन्सीमध्ये जाणवतोय मानसिक ताण ? पोस्टपार्टम डिप्रेशनचे ठरू शकते कारण, अशी घ्या काळजी
पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे (प्रसूतीनंतरचे नैराश्य) महिलांचे मानसिक आरोग्य खूप बिघडते. त्यांच्या मनात विविध विचार येऊ शकतात, अशा परिस्थितीत त्या स्वत:चे किंवा बाळाचे नुकसान करू शकतात.
नवी दिल्ली – प्रेग्नन्सीदरम्यान अनेक महिलांना मानसिक ताण-तणावाचा (mental stress) सामना करावा लागू शकतो. हाच तणाव काही काळानंतर डिप्रेशनसाठी (नैराश्य) कारणीभूत ठरतो. मात्र अनेक प्रकरणांमध्ये महिलांना याची जाणीवही नसते. त्याचे अनेक तोटे (side effects) आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याचा, गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. दुसरं म्हणजे, कधीकधी नैराश्याचा कालावधी बराच काळ टिकतो आणि बाळाच्या जन्मानंतरही महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत हा एक मानिसक आजार बनतो, ज्याला वैद्यकीय भाषेत पोस्टपार्टम डिप्रेशन (postpartum depression) असे म्हटले जाते.
मानसोपचार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गरोदरपणात महिलांना मानसिक ताण जाणवत असेल आणि जर त्यांचे मूड स्विंग्स वाढत असतील तर ही नैराश्याची सुरुवात असू शकते. याची अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये निद्रानाश, उदास वाटणे, भूक न लागणे आणि चिडचिड होणे यांचा समावेश असतो. जर एखाद्या गर्भवती महिलेच्या बाबतीत ही लक्षणे दिसत असतील तर अशा वेळी तिने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या समस्यांवर जर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर ही परिस्थिती पोस्टपार्टम डिप्रेशनपर्यंत जाऊ शकते.
अशा परिस्थितीमध्ये प्रसूतीनंतरही म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतरही आईचे मानसिक आरोग्य चांगले रहात नाही, ज्यामुळे त्या स्त्रीवर आणि तिच्या बाळावरही गंभीर परिणाम होतो. प्रत्येक महिलेच्या बाबतीत अशी परिस्थिती उद्भवत नसली तरीही 30 ते 40 टक्के प्रकरणांमध्ये ही समस्या उद्भवते.
हेही असू शकते पोस्टपार्टम डिप्रेशनचे कारण
– आई झाल्यानंतर कुटुंबाचा पाठिंबा न मिळणे
– कामाची आणि करिअरची चिंता वाटणे
– शरीरातील फॅट्स खूप वाढणे किंवा अतिशय बारीक होणे
– मानसिक तणाव जाणवणे
पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे होणारे नुकसान
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे महिलांचे मानसिक आरोग्य खूप बिघडते. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ शकतात. अशा परिस्थितीत संबंधित स्त्री ही स्वतःचे किंवा बाळाचे देखील नुकसान करू शकते. त्यामुळे गरोदरपणातच ज्याप्रमाणे आईच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे तिच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. गरोदरपणात मानसिक आरोग्याशी संबंधित लक्षणे दिसल्यास ताबडतोब उपचार सुरू करावेत, जेणेकरुन पोस्टपार्टम डिप्रेशनची स्थिती टाळता येईल.
अशी घ्या काळजी
– गरोदर असताना घरातील लोकांनी त्या महिलेशी संवाद साधत रहावा.
– घरातील वातावरण चांगले व सकारात्मक ठेवावे. नकारात्मक बोलू नका
– गरोदर स्त्रीसमोर चांगले आचरण ठेवावे. तिला कोणताही मानसिक ताण येईल अशी वागणून नसावी, ताण येईल असे विषय टाळावेत.
– गरोदर महिलेने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करावा.
– आहाराची योग्य काळजी घ्यावी, पौष्टिक आहार सेवन करावा.
– पुरेशी व शांत झोप घ्यावी.
– गुन्हेगारीशी संबंधित घटना , अथवा हिंसक दृष्यं पाहू नयेत.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)