गरोदरपणात जास्त पिताय ‘हे’ पेय ? अहो, कमी करा सेवन अन्यथा बाळाला पोहोचू शकतो धोका
गरोदरपणात आई व बाळाच्या तब्येतीसाठी चांगला व पौष्टिक आहार खायचा सल्ला दिला जातो. काही पदार्थांचे सेवन हे आई व बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी हानिकारक समजले जाते.
नवी दिल्ली : गरोदरपणात (pregnant lady care) महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम त्यांच्या बाळावर (impact on baby) नक्कीच होतो. तुम्ही काय खात आहात, काय पीत आहात आणि काय करत आहात, या सर्व गोष्टींचा तुमच्या पोटातील बाळावर होत असतो. जर तुम्हाला चहा-कॉफी प्यायची खूप आवड असेल तर आजच ही सवय आटोक्यात आणा. कारण तुमची आवडती ‘कॉफी‘ ही तुमच्या व बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते, असे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. जर तुम्ही गरोदर असाल आणि कॉफी पिण्याचे (coffee) शौकीन असाल, तर कॉफी पिण्याचे तोटे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
एका अहवालानुसार, या सर्वेक्षणात असे आढळून आले की, कॉफी पिणाऱ्या 80 टक्के गर्भवती महिला त्यांच्या कॅफिनच्या सेवनाकडे लक्ष देत नाहीत. गरोदरपणात दररोज 200 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफीन घेऊ नये हे माहीत असूनही त्या जास्त प्रमाणात कॉफी पितात. जर तुम्ही तुमच्या कॅफिनच्या सेवनाकडे लक्ष दिले नाही तर त्याचा तुमच्या बाळावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
किती कॉफी पिणे ठरते योग्य ?
मात्र, असे नाही की तुम्ही गर्भधारणेदरम्यान कॉफीचे सेवन पूर्णपणे बंद केले पाहिजे. परंतु जर तुम्ही दररोज 200 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफीन घेत असाल तर तुम्हाला ते कमी करावे लागेल. गरोदरपणात 200 mg पेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने तुम्ही आणि तुमचे बाळ, दोघांनाही आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही गर्भवती असाल आणि कॉफीशिवाय जगू शकत नसाल तर दिवसातून फक्त दोन कप इन्स्टंट कॉफी आणि एक कप फिल्टर कॉफी पिऊ शकता, असे तज्ज्ञ सांगातात. कारण यापेक्षा जास्त कॉफी पिणे हे आई व बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते.
आजकाल, बहुतेक कॉफी शॉपमध्ये कॅफिनचा वापर केला जातो, जो गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. सर्वेक्षणात असे आढळून आले की हाय स्ट्रीट चेन कोस्टा येथील कॅपेचिनोच्या एका मध्यम आकाराच्या ग्लासमध्ये 325 मिलीग्राम कॅफिन असते, जे गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दीड पट जास्त आहे. मध्यम आकाराच्या स्टारबक्स कॅपेचिनोमध्ये सुमारे 66mg कॅफिन असते.
जास्त कॉफी पिण्याचे काय दुष्परिणाम ?
सर्वेक्षणानुसार, गरोदरपणात गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात कॅफेनचे सेवन केल्याने बाळाचा जन्म वेळेपूर्वी होऊ शकतो. अथवा जन्मानंतर लगेचच मृत्यू होण्याचा धोका असतो. एवढेच नव्हे तर कॅफेनच्या अति सेवनामुळे बालक मृत जन्माला येण्याचीही शक्यता आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्या स्त्रिया गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दररोज 500 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करतात त्यांना हृदयाची गती वाढणे, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे आणि निद्रानाश अशा समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता जास्त असते.