धूम्रपानाची सवय ठरू शकते घातक, जाऊ शकतो अचानक जीव
फुफ्फुसांचा कॅन्सर झालेल्यांपैकी 60 टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारे असतात. त्यामध्ये सिगारेट आणि बिडी ओढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. महिला आणि पुरुष या दोहोंचाही त्यात समावेश आहे.
नवी दिल्ली – आजकालची खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आपलं शरीर अनेक आजारांना बळी पडतं आपल्या अनेक वाईट सवयीमुंळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. त्यापैकीच एक वाईट सवय म्हणजे धूम्रपान (Smoking). बहुतेक लोकांना असं वाटतं की धूम्रपान केल्याने केवळ फुफ्फुसांचा कॅन्सर (cancer) होतो, मात्र हे खरं नाही. धूम्रपान केल्याने हृदयरोग आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो. ज्यामुळे अनेक व्यक्तींचा अचानक मृत्यू (sudden death) देखील होऊ शकतो.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तरुणांमध्ये धूम्रपान करण्याचा ट्रेंड सध्या लक्षणीयरित्या वाढला आहे. 16 ते 18 या वयोगटातील तरुणही धूम्रपान करताना दिसत आहेत, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याच केसेसमध्ये लहान वयातच फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा हृदयरोग देखील होऊ शकतो.
धूम्रपान केल्याने होणारे तोटे
फुफ्फुसांचा कॅन्सर झालेल्यांपैकी 60 टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारे असतात, असे डॉक्टर सांगतात. त्यामध्ये सिगारेट आणि बिडी ओढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. महिला आणि पुरुष या दोहोंचाही त्यात समावेश आहे. आजकाल लहान वयातच फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान होत आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेले हवेचे प्रदूषण हेही फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. मात्र असे असले तरीही धूम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका
सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज होऊ शकतो. या सर्व परिस्थितीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यूही जाऊ शकतो. कोरोना महामारीपासून हा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कोविडमुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते आणि धूम्रपानामुळेही नुकसान होते.
पोटाच्या कॅन्सरचा धोका
धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर तर होतोच शिवाय पोटाचा कर्करोग होण्याचीही भीती असते. त्यामुळे धूम्रपानापासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे.