कोरोनानंतर अचानक तरुणांच्या मृत्यूत का झाली वाढ ? ICMR कारणे शोधणार
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत कोरोनानंतर तरुणांच्या अचानक झालेल्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली होती.
नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : कोरोना व्हायरसच्या साथीत लाखो रुग्णांचे मृत्यू झाले. परंतू ही कोरोनाची लाट गेल्यानंतरही अचानक चाळीशीच्या आतील तरुणांचे हार्ट अटॅकने आकस्मिक मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने आता याचा तपास करण्यासाठी दोन स्वतंत्र अभ्यास सुरु केले आहेत. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी यासंदर्भात माहीती दिली आहे.
कोरोनाच्या साथीनंतर अलिकडे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे अचानक हृदय विकराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आयसीएमआर या प्रकरणांचा अभ्यास करणार आहे. डॉ. बहल यांनी याबद्दल माहीती देताना सांगितले की आम्ही कोणत्याही स्वरुपाचा गंभीर आजार नसताना झालेल्या मृत्यूंचा अभ्यास करीत आहोत. हा अभ्यास कोविड-19 च्या परीणाम समजण्यास मदत होणार आहे. तसेच होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यासाठी उपाय योजण्यास मदत होणार आहे. आस्कमिक मृत्यू म्हणजे ज्यांना गंभीर आजार नाही असे मृत्यू असे त्यांनी म्हटले आहे.
मृत्यूमागे काही पॅटर्न आहे का ?
आयसीएमआरने दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( AIIMS ) मधील 50 मृतदेहांचा अभ्यास केला आणि काही महिन्यांनी शंभर प्रकरणांचा अभ्यास केला जाणार आहे. अशा प्रकरणात मानवी शरीरात काही परिवर्तन झाले का हे समजण्याचा प्रयत्न आयसीएमआर करणार आहे. ज्यामुळे कोविड-19 नंतर तरुणांच्या अचानक झालेल्या मृत्यूंचा कारणांचा छडा लावण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे अशा मृत्यूमागे काही पॅटर्न आहे का ? याची माहीती मिळण्यास मदत मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली माहीती
आयसीएमआरने पूर्वी पासून या प्रकरणाचा अभ्यास करीत आहे, एका अभ्यासात 18 ते 45 वयोगटातील मृत्यूंचा अचानक झालेल्या मृत्यूचा डाटा जमा केला होता. देशभरातील 40 रुग्णालयातील माहीती मिळविली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत कोरोनानंतर तरुणांच्या अचानक झालेल्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली होती.