TB : घातक क्षयरोगाची वाढतेय आकडेवारी! लक्षणं काय? काळजी काय घ्याल? वाचा सविस्तर…
टीबी म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि त्याचा फुफ्फुसांवर परिणाम होतो.
टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि त्याचा फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवरदेखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते. भारतामध्ये वर्षभरात टीबीच्या 5 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. टीबी म्हणजेच क्षयरोगामुळे 2020 साली 1 लाख लोकांमागे 32 मृत्यू झाले. अशी प्रकरणे संपवण्यासाठी केंद्र सरकारने 2025 सालापर्यंत देशाला क्षयरोगमुक्त अथवा टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. याअंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी ‘प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत’ (TB free Inida Campaign) अभियानाला सुरूवात केली असून ती एक लोकचळवळ बनवण्याचे आवाहन केले आहे. देशातील टीबी रुग्णांची स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या…
5 वर्षात टीबीचे रुग्ण किती वाढले?
गेल्या 5 वर्षांचे रेकॉर्ड पाहिले तर टीबीच्या रुग्णांमध्ये दरवर्षी वाढ झाली आहे. 2017साली हा आकडा 18.2 लाख, 2018 साली 21.5 लाख तर 2019 साली 24.4 लाख टीबीचे रुग्ण होते. 2020 साली हा आकडा कमी होऊन 18.05 लाख तर 2021 साली टीबीचे 19.33 लाख रुग्ण होते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोविडमुळे चाचणीत व्यत्यय आल्याने 2020 व 2021 साली संख्या कमी झाली.
तरुणांमध्ये टीबीची सर्वाधिक प्रकरणे
टीबीमुळे सर्वात जास्त मृत्यू तरूणांचे होत आहेत. त्यामध्ये 15 ते 30 वयोगटातील तरुणांचा आकडा सर्वाधिक आहे. टीबीचा सर्वाधिक त्रास पुरुषांना होतो, असे आकडेवारीवरून समजते.
कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण?
राज्यांची आकडेवारी पाहिली तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात टीबीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 20 टक्के, महाराष्ट्रात 9 टक्के रुग्ण आढळले. तर मध्य प्रदेश 8 टक्के, राजस्थान आणि बिहारमध्ये प्रत्येकी 7 टक्के रुग्ण आढळले आहेत.
सरकारने किती केला खर्च?
टीबीशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र त्याचा रुग्णांच्या संख्येवर काही परिणाम होताना दिसत नाही. 2014-15 साली सरकारने 639.94 कोटी रुपये खर्च केले तर 2015-16 साली 639.84 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2016-17 साली 677.78 कोटी रुपये इतका आकडा होता. 2017-18 साली सर्वाधिक रक्कम 2759.44 कोटी रुपये तर 2018-19 साली 2237.79कोटी रुपये खर्च झाले. 2019-20 साली टीबीसाठी 2443.81 कोटी रुपये केंद्र सरकारने टीबी निर्मूलनासाठी खर्च केले.
टीबीचे 5 मोठे रिस्क फॅक्टर्स –
- कुपोषण, मद्यपान, धूम्रपान, मधुमेह म्हणजेच डायबिटीस आणि एचआयव्ही हे टीबीचे 5 मोठे रिस्क फॅक्टर्स आहेत.
- टीबीची लक्षणे दिसल्यास काय करावे?
- 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे. ही लक्षणे लपवू नयेत अथवा त्याकडे दुर्लक्ष करू नये.
- खोकताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवावा.
- औषधांचा कोर्स पूर्ण करावा.
- भरपूर पोषक तत्वे असलेला, चौरस आहार घ्यावा.
- सिगरेट, हुक्का तंबाखू आणि दारू यापासून लांब राहावे.