या दोन मोठ्या ब्रँडच्या शॅम्पूमुळे कर्करोगाचा धोका, कंपनीने परत मागविली उत्पादनं
तुम्ही वापरात असलेल्या सुप्रसिद्ध कंपनीचा शॅम्पू कदाचित कर्करोगाला आमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामधले घातक रसायनामुळे कर्करोगाची शक्यता आहे.
नवी दिल्ली, युनिलिव्हर (Unilever) या सुप्रसिद्ध कंपनीच्या अनेक ब्रँडच्या शाम्पूमध्ये कॅन्सर निर्माण करणारे रसायन सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. कंपनीने यूएस बाजारातून Dove, Nexxus, Suave, TIGI आणि TRESemmé aerosol ड्राय शैम्पू परत मागवले (Recall) आहेत. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, त्यामध्ये बेंझिनची उपस्थिती आढळून आली आहे. या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननुसार (FDA) , ही उत्पादने ऑक्टोबर 2021 पूर्वी तयार करण्यात आली होती आणि देशभरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरीत करण्यात आली होती. यामध्ये Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut, Nexxus Dry Shampoo Refreshing Mist आणि Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive यांचा समावेश आहे.
का आहे कर्करोगाचा धोका?
बेंझिनमुळे मानवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. एफडीएने आपल्या रिकॉल नोटीसमध्ये म्हटले आहे की बेंझिन मानवी शरीरात अनेक प्रकारे प्रवेश करू शकते. तो वासाने, तोंडातून आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. FDA ने दिलेल्या माहितीनुसार लोकांनी अशा उत्पादनांचा वापर करणे थांबवावे आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी UnileverRecall.com च्या वेबसाइटला भेट द्यावी. युनिलिव्हरने अद्याप यावर कुठलेही भाष्य केलेले नाही.
या आधीही परत मागविले होते उत्पादने
युनिलिव्हरच्या या निर्णयामुळे पर्सनल केअर उत्पादनांमध्ये एरोसोलच्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या दीड वर्षात बाजारातून अनेक एरोसोल सनस्क्रीन परत मागवण्यात आले आहेत. यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनचे न्यूट्रोजेना, एजवेल पर्सनल केअर कंपनी बनाना बोट आणि बेयर्सडॉर्फ एजीच्या कॉपरटोनचा समावेश आहे.
गेल्या वर्षी, प्रॉक्टर अँड गॅम्बलने 30 हून अधिक एरोसोल स्प्रे हेअरकेअर उत्पादने देखील परत मागवली होती. यामध्ये ड्राय शॅम्पू आणि ड्राय कंडिशनरचा समावेश होता. या उत्पादनांमध्ये बेंझिन असू शकते, असा इशारा कंपनीने दिला होता. कंपनीने डझनहून अधिक ओल्ड स्पाईस आणि सीक्रेट ब्रँड्सचे डिओडोरंट्स आणि स्प्रे देखील परत मागवले आहेत. त्यामध्ये बेंझिन असू शकते, अशी भीती कंपनीला होती.