‘या’ 4 कारणांमुळे लोकांना होतो मधुमेह, तुम्हीही करताय का ही चूक?
भारतात सुमारे 7.7 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. 2025 सालापर्यंत हा आकडा 12 कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हा आजार वाढत आहे.
नवी दिल्ली – खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैली तसेच व्यायामाचा अभाव यामुळे दरवर्षी मधुमेहाची (diabetes) प्रकरणे वाढताना दिसत आहेत. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. 2025 सालापर्यंत हा आकडा 12 कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे लहान मुलंही या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. मुलांमध्ये टाइप-2 मधुमेहाची प्रकरणे फार वाढत आहेत. खरंतर चांगली जीवनशैली (bad lifestyle), खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि आरोग्याकडे (health) नीट लक्ष दिले तर मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. मात्र लोकं या आजाराकडे खूप दुर्लक्ष करतात.
मधुमेह हा एक असा आजार आहे जो आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे डोळे, किडनी, हृदय आणि त्वचेवरही परिणाम होतो. जर रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रित केली नाही तर आपली दृष्टी कमी होण्याचा किंवा दृष्टी जाण्याचाही धोका असतो. मधुमेहाचा परिणाम किडनीवर होत असेल, तर आपली किडनीही खराब होऊ शकते. त्वचेवर मधुमेहाचा परिणाम झाल्यास मानेच्या आजूबाजूची त्वचा काळवंडू लागते.
मधुमेह होण्याची कारणे जाणून घेऊया.
1) दररोज व्यायाम न करणे
अनेक लोकांचे वजन वाढत नाही, ते आहे तेवढेच राहते. त्यामुळे आपल्याला व्यायामाची गरज नाही, असं लोकांना वाटतं, पण ते योग्य नाही. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात कमीत कमी 20 मिनिटे तरी काही ना काही व्यायाम केलाच पाहिजे. जर तुमचं वजन सामान्य पातळीतले असले तरीही व्यायाम करावा. असे केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.
2) धूम्रपान व मद्यपान न सोडणे
आजकाल धावपळीच्या जीवनात अनेक जणांना मानसिक ताणही असतो. त्यावर मात करण्यासाठी किंवा तो ताण दूर करण्यासाठी काही लोक धूम्रपान करतात तसेच दारूचा आधारही घेतात. ज्यामुळे त्यांना या गोष्टींचे व्यसन लागू शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये त्या व्यक्ती धूम्रपान आणि मद्यपान सोडू शकत नाहीत. मात्र त्यामुळे भविष्यात मधुमेहाचा धोका खूप वाढतो.
3) सकाळी नाश्ता न करणे
बरेच लोक सकाळच्या वेळी नाश्ता न करताच आपल्या कामाला जाताक. पण हे चुकीचे आहे. चांगली जीवनशैली आणि आरोग्य यासाठी नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. सकाळी नाश्ता करणे शक्य नसेल तर आहारात काही फळांचा तरी समावेश करावा.
4) अनुवांशिक कारणांकडे दुर्लक्ष करणे
मधुमेह हा अनुवांशिकतेमुळे होऊ शकतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा आई-वडिलांना मधुमेह असेल तर तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. पण लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, ना ते कधी मधुमेहाची तपासणी करून घेत नाहीत. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हा आजार शरीरात वाढू लागतो आणि गंभीर परिस्थिती उद्भवल्यानंतर तपासणी केल्यावर त्याबद्दल समजते. त्यामुळे तुमच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असेल तर वेळच्या वेळी तपासणी करत रहावी.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)