Lungs health : हवा प्रदूषणामुळे होतंय फुप्फुसांचे नुकसान, जाणून घ्या लक्षणे
जगभरात हवेतील प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.
जगभरात हवा प्रदूषणाचा (Air Pollution) मुद्दा कळीचा ठरत आहे, तरी त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असून त्याला वेळीच आळा न घातल्यास, भविष्यात त्याचे घातक परिणाम सहन करावे लागतील. प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे दरवर्षी लाखो लोक प्रभावित होत असतात. तज्ञांच्या मते, दमा (Asthma), कर्करोग (Cancer) यासारखे जीवघेणे आजारही प्रदूषणामुळे वाढू शकतात. फुप्फुसे (Lungs) ही आपल्या शरीरातील महत्वाचा भाग असून हवेच्या प्रदूषणामुळे फुप्फुसांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषत : हिवाळ्यात जेव्हा प्रदूषणात वाढ होते, तेव्हा फुप्फुसांशी संबंधित आजारात मोठी वाढ दिसून येते. शरीरात काही बदल किंवा खालील लक्षणे दिसल्यास तुमच्या फुप्फुसांवर परिणाम होऊन त्यांचे नुकसान होत आहे, हे समजून घ्या व त्वरित डॉक्टरांना दाखवा.
श्वास घेण्यास त्रास होणे
ज्या लोकांना श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होत असेल, त्यांनी या गंभीर लक्षणाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नये. फुप्फुसांवर परिणाम झाल्याने हा त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास वारंवार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जाणे कधीही चांगले. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतता.
डोळ्यांची जळजळ होणे
सतत मोबाईल पाहणे, कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करणे यामुळे डोळ्यांवर ताण येऊन त्यांचे नुकसान होते. हवा प्रदूषणामुळेही डोळ्यांना त्रास होऊ शकतो. डोळे चुरचुरणे, पाणी येणे, डोळे जळजळणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी डोळ्यांवर जास्त ताण येऊ देऊ नये. थोड्या-थोड्या वेळाने ते थंड पाण्याने धुवावेत. डोळयांचा त्रास फारच वाढल्यास वेळीच नेत्रतज्ञांना दाखवून योग्य उपाय करावेत.
सतत खोकला होणे
हवा प्रदुषणामुळे जर फुप्फुसांचे नुकसान होत असेल तर त्याची अनेक लक्षणे दिसतात. त्यापैकी एक मुख्य लक्षण म्हणजे सतत खोकला होणे. जर तुम्हाला खोकल्याचा त्रास सतत होत असेल तर तुमच्या छातीत इन्फेक्शन झालेले असू शकते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते व तुम्ही सारखं आजारी पडू शकता. त्यामुळे नेहमी खोकला होत असेल तर डॉक्टरांना दाखवून औषधं सुरु करावीत.
ॲंक्झायटी
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर रुग्णांना ॲंक्झायटीचा त्रास म्हणजेच घाबरल्यासारखे वाटू शकते. हा एक पॅनिक ॲटकही असू शकतो. अशावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करावा, मोठा श्वास घ्यावा. थोडावेळ मोकळ्या हवेत फिरून यावे, त्याने तुमचा त्रास कमी होऊ शकतो.