Smartphone side effects : रुमेटाईड आर्थ्रायटिस म्हणजे काय ? कशामुळे होऊ शकतो हा त्रास ?
स्मार्टफोनचा सतत वापर करू नये, असे तज्ज्ञ सांगतात. फोन सतत हातात धरल्याने मनगटात वेदना होतात, ज्यामुळे नंतर संधिवाताचा त्रास होऊ शकतो.
नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या जमान्यात सध्या लोकांचा स्मार्टफोनचा (Smartphone) वापर खूप वाढला आहे. फोनशिवाय लोकांचे पानही हलत नाही. स्मार्टफोनमुळे सध्या लोकांचे आयुष्य खूप सोपे झाले आहे. लोक आपली अनेक कामे फोनवरूनच करत असतात. आता कॅमेऱ्याची (camera) जागाही फोनने घेतली आहे. लोकांमध्ये सेल्फी घेण्याचा ट्रेंडही (trend of selfie) खूप वाढला आहे. चांगला फोटो काढण्यासाठी लोक अनेक प्रकारे हात वाकवण्याचा प्रयत्न करतात. सेल्फी घेण्याचा हा छंद लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जडला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते ?
असाच बराच वेळ फोन हातात धरून ठेवल्याने ऑस्टिओ-आर्थ्रायटिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. यासोबतच हाताची बोटे आणि अंगठाही वक्र होण्याचे ते कारण बनू शकते. जे लोक फोनवर तासनतास गप्पा मारण्यात घालवतात त्यांना हा त्रास होण्याचा सर्वाधिक धोका असतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सेल्फी घेताना किंवा फोन वापरताना लोक हात वाकवतात, ज्यामुळे मनगट आणि कोपराच्या स्नायूंच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो.
रुमेटाईड आर्थ्रायटिस होण्याचा धोका
वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन्सच्या सांगण्यानुसार, ब्रेकशिवाय अनेक तास स्मार्ट फोन वापरू नये. असे केल्याने मनगट आणि कोपर दुखू लागते. हे दुखणे दीर्घकाळ सुरू राहिल्यास संधिवाताचा म्हणजेच आर्थ्रायटिस होण्याचा धोका असतो. त्यामुळे सांधे आणि हाडांमध्ये वेदना कायम राहतात. यामुळे बोटांना देखील सूज येऊ शकते. हाताची बोटे किंवा अंगठे वाकडे होण्याचा धोकाही संभवतो. स्मार्टफोन जास्त वेळ हातात धरून ठेवल्याने कोपर आणि मनगट दुखण्याची समस्या उद्भवल्याची अनेक प्रकरणे सध्या पाहायला मिळत आहेत. विशेषत: तरुणांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे.
मानेलाही होऊ शकतो त्रास
अनेक स्मार्टफोन युजर्स त्यांचा फोन हातात धरून तासन्तास वापरतात. ज्यामुळे करंगळीवर कायमची छाप उमटू शकते. फोन, टॅब्लेट किंवा कॉम्प्युटर यांसारख्या उपकरणांसाठी सांधे किंवा बोटांचा दीर्घकाळ अतिवापर केल्याने ऑस्टियोआर्थ्रायटिस होऊ शकते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की आपल्या मांडीवर फोन ठेवून वापरल्याने डोके आणि मान वाकण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मानेला इजा होण्याचाही धोका असतो. स्मार्टफोन वापरताना अनेकजण वाकत राहतात. यामुळे मणक्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
अशा परिस्थितीत, लोकांना स्मार्टफोनचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला जातो. एका वेळी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोन न वापरण्याचा प्रयत्न करावा. मधेमधे ब्रेक घेऊन, हात व मानेची हालचाल व व्यायाम करत रहा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.