Thyroid Awareness Month: मोठ्यांनाच नव्हे तर लहान मुलांनाही असतो थायरॉईडचा धोका, अशी ओळखा लक्षणे
थायरॉईड ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलंही या आजाराच्या गर्तेत सापडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये याची कारणे व लक्षणे जाणून घेतल्यास थायरॉईड रोखणे शक्य होऊ शकते.
नवी दिल्ली – आजकाल सर्वजण आपापल्या कामात खूप व्यस्त असतात. रोजच्या घाई-गर्दीच्या शेड्युलमुळे लोकांचं त्याच्या आरोग्याकडे (health) दुर्लक्ष होत. मात्र या निष्काळजीपणामुळे ते अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. खराब जीवनशैलीमुळे आजकाल बीपी, मधुमेह यासारखे अनेक आजार सामान्य झाले आहेत. आजकाल प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने (health problems) त्रस्त असलेले दिसतात. थायरॉईड (thyroid) हेही त्यापैकीच एक असून त्याची झळ केवळ प्रौढांनाच नव्हे तर लहान मुलांनाही बसू शकते. आपल्या शरीरासाठी थायरॉईड हार्मोन्स हे अतिशय महत्वाचे असून आपल्या घशातील थायरॉईड ग्रंथीद्वारे हे हार्मोन निर्माण होते.
लहान मुलांमध्ये थायरॉईड होण्याचे कारण
मुलांमध्ये थायरॉईडची समस्या निर्माण झाल्यास त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळा येतो. एवढंच नव्हे तर त्यामुळे मुलं इतरही अनेक समस्यांना बळी पडतात. मुलांमध्ये थायरॉईड होण्याची अनेक कारणे असू शकतात.
– मुलांमध्ये थायरॉईडची समस्या अनुवांशिकही असू शकते.
– अकाली जन्माला आलेली मुलंही या समस्येला बळी पडू शकतात.
– गर्भाशयात योग्य पोषण न झाल्यास थायरॉईडची समस्या उद्भवू शकते.
– शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळेही थायरॉईड होऊ शकतो.
– हाशिमोटो थायरोडिटिस आणि ग्रेव्ह्स यांसारख्या ऑटोइम्यून रोगांमुळेदेखील थायरॉईड होऊ शकतो.
मुलांमध्ये दिसणारी थायरॉईडची लक्षणे
मुलांमध्ये हा आजार अनेक कारणांमुळे होऊ शकतो. मात्र योग्य वेळी त्याबद्दल समजल्यास तर तो गंभीर रूप धारण करण्याआधीच रोखता येते. मुलांमध्ये थायरॉईडची अशी काही लक्षणे दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर ठरू शकते. या लक्षणांच्या सहाय्याने तुम्ही मुलांमधील थायरॉईड ओळखू शकता.
– लठ्ठपणाची समस्या
– त्वचा कोरडी व निर्जीव होणे
– थायरॉईड ग्लँडचा आकार वाढणे
– लवकर थकवा येणे व सहज आजारी पडणे
– हाडं, केस आणि दात कमकुवत होणे
– बद्धकोष्ठता, अपचन यांसारखे पोटाचे विकार होणे
– डोळे सुजणे, श्वास घेण्यास त्रास होणे
– मुलांची मानसिक व शारीरिक वाढ मंदावणे