Joint Pain : अजून घाला हाय हील्स आणि ओढवून घ्या सांधेदुखी ! सांध्यांच्या वेदनांसाठी तुमच्या चुकाच ठरतात कारणीभूत
आपल्या रोजच्या जीवनातील अशा अनेक सवयी असतात ज्यामुळे नकळत सांधेदुखी ओढावून घेऊ शकतो.
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी सांधेदुखीची (joint pain) समस्या मोठ्या वयाच्या व्यक्ती आणि वृद्धांना भेडसावत असे. पण कालांतराने हा त्रास आता तरूणांनाही (young persons) होऊ लागला आहे. सांध्यातील हलक्या वेदनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, परंतु ही समस्या तुमच्या स्नायूंमध्ये पेटके येणे, लिगामेंट्स कमकुवत होणे आणि कार्टिलेज (कूर्चा) कमजोर होण्यास मुख्यत्वे कारणीभूत ठरू शकते. आजच्या काळात आपल्या रोजच्या जीवनातील अशा अनेक सवयी (daily habits) देखील सांधेदुखीचे कारण बनतात.
आपल्या चुकीच्या सवयींचा परिणाम खूप दिवसांनी सांध्यांवर दिसून येतो. सांधेदुखीमुळे माणसाला तीव्र वेदना होऊ लागतात आणि तो कोणतेही काम करू शकत नाही. आपले सांधे कमकुवत होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया.
जास्त व्यायाम करणे
व्यायामाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, हे खरं आहे. पण जर तुम्ही एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही नुकतेच जिम सुरू केले असेल तर सुरुवातीला हलक्या वजनाचा व्यायाम करा आणि स्ट्रेचिंग व्यायाम करू शकता.
हाय हील्स घालणे
आजच्या युगात अनेक स्त्रिया हाय हिल्सच्या चपला घालतात. या हाय हील्स तासनतास परिधान केल्याने महिलांच्या घोट्यात वेदना होतात. ते परिधान करताना पडण्याची शक्यता खूप जास्त आहे. यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते.
चुकीच्या आकाराच्या चपला घालणे
जर तुम्ही चुकीच्या आकाराच्या चपला अथवा शूज घातले तर त्यामुळे तुमचे पाय दुखू शकतात. चुकीच्या आकाराच्या शूजमध्ये धावणे किंवा खूप घट्ट शूज घातल्याने घोट्यात वेदना होऊ शकतात. जर तुम्ही चुकीचे शूज घालून चालत असाल तर त्यामुळे पायांच्या सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात.
जास्त वजन उचलणे
जर तुम्ही जास्त वजन उचलले तर सांधेदुखी होऊ शकते. जिममध्ये वर्कआउट करताना जड वजन उचलल्यानेही सांधेदुखी होऊ शकते. याशिवाय चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यानेही सांध्यातील समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जिममध्ये ट्रेनरच्या देखरेखीखालीच व्यायाम करा.
तासन् तास मोबाईलवर टाईप करणे
जर तुम्ही मोबाईलमध्ये तासनतास मेसेज टाईप करत असाल तर हाताचे सांधे दुखू शकतात. यासोबतच तासनतास मान खाली ठेवल्याने मानदुखीचा त्रास जाणवतो. मोबाईल हे तुमच्या सांधेदुखीचे मुख्य कारण बनत आहे.
जड वजनाची बॅग उचलणे
ऑफिस बॅगमध्ये जड वस्तू ठेवल्याने तुमच्या खांद्याच्या सांध्यामध्ये वेदना होऊ शकतात. म्हणूनच बॅगेत फक्त जीवनावश्यक वस्तू ठेवा. ज्या गोष्टींची गरज नाही त्या ऑफिसमध्ये किंवा घरात ठेवा. यामुळे तुमच्या खांद्यावर अनावश्यक दबाव पडणार नाही.
धूम्रपान अथवा तंबाखूचे सेवन करणे
धूम्रपान आणि तंबाखूमुळे सांधेदुखीची समस्या वाढू शकते. सिगारेटमध्ये असलेले निकोटीन हाडांमध्ये जाणाऱ्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करते. धूम्रपानामुळे आरोग्यावर इतरही अनेक घातक परिणाम होतात.