Pilesचा होतोय त्रास? आजच सुधारा ‘या’ चुकीच्या सवयी
पाइल्स म्हणजेच मूळव्याधाचा त्रास टाळायचा असेल तर आहारातून मसालेदार आणि तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.
नवी दिल्ली – आजकाल पाइल्स म्हणजे मूळव्याधाची (piles) समस्या खूप सामान्य झाली आहे. हा आजार वाढत्या वयात त्रास देत असला तरी, चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली (bad lifestyle) यामुळे आता लहान वयातच लोकांना त्रास होत आहे. मूळव्याध हा एक असा आजार आहे ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बद्धकोष्ठता (Constipation). बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वाराशी संबंधित आजार जसे की मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला विकसित होतात.
मूळव्याधाचा त्रास असेल तर त्यामध्ये गुदद्वारच्या नसांना सूज येऊ लागते. मूळव्याधामुळे गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील भागात जखम होते, त्यातून कधीकधी रक्तस्त्रावही होतो. मुळव्याध होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे तुमचा आहार आणि दैनंदिन जीवनातील चुकीच्या सवयी. तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न, मसालेदार अन्न, मद्यपान, दुग्धजन्य पदार्थ, आणि आहारात जास्त मीठाचे सेवन केल्याने मूळव्याध होतो. मलत्याग करताना रक्त येणे, गुदद्वारात खाज सुटणे, कधीकधी वेदना होणे, ही लक्षणे दिसतात. एका रात्रीत मूळव्याधाचा आजार होत नाही, तुमच्या वर्षानुवर्षांच्या चुकीच्या सवयी या आजाराला कारणीभूत ठरतात.
मूळव्याधास कारणीभूत ठरणाऱ्या सवयी
जड वजन उचलणे
तज्ज्ञांच्या मते, जड वस्तू उचलल्याने अनेकदा पोट आणि गुदद्वाराच्या भिंतींवर दबाव येतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या प्रभावित होतात आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. जड वस्तू उचलून नेल्याने शौचालयाच्या मार्गावर खूप दबाव येतो, ज्यामुळे या आजाराचा धोका वाढतो.
आहारात फायबरची कमतरता असेल तर मूळव्याधाचा धोका अधिक
जर तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण कमी असेल तर तुम्हाला मूळव्याध होण्याचा धोका जास्त असतो. आहारात फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेचा धोका वाढतो आणि मलाशयावर अधिक दबाव येतो. मूळव्याध टाळायचा असेल तर आहारात हिरव्या भाज्या, फळे यांचा समावेश करावा. तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे.
मसालेदार पदार्थांचे अतिसेवन
जर तुम्हाला गरम आणि मसालेदार अन्न खाण्याची सवय असेल तर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास आजार होऊ शकतो. चटपटीत, तिखट आणि मसालेदार अन्न हे मूळव्याध होण्याचा धोका वाढवू शकतो. मूळव्याध होणे टाळायचे असेल तर अती मसालेदार, तेलकट अन्न खाणे टाळावे.
लठ्ठपणाही ठरतो कारणीभूत
ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्यांना मूळव्याध होण्याचा धोका जास्त असतो. मूळव्याधाचा धोका टाळायचा असेल तर वज नियंत्रणात ठेवावे, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. आहारातील फॅट्स आणि साखरेचे प्रमाण कमी केल्यास वजन नियंत्रणात राहते.
जास्त वेळ बसल्याने मूळव्याधाचा धोका वाढू शकतो
तुम्ही जर एकाच जागी बराच काळ बसून काम करत असाल तर ही सवय बदला. एकाच जागी जास्त वेळ बसल्याने मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही बसून काम करत असाल तर दर एक तासाने थोडा वेळ ब्रेक घ्या आणि फेऱ्या मारा.
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठता हे मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. बद्धकोष्ठतेमुळे, मलत्याग करताना अनेक वेळा जोर लावावा लागतो, ज्यामुळे मूळव्याधची समस्या उद्भवू शकते.