Diabetes : छोट्या सवयींचे मोठे गंभीर परिणाम, तुम्हालाही ‘या’ सवयी असतील तर ब्लड शुगर वाढलीच म्हणून समजा !
मधुमेहामध्ये औषधाबरोबरच आहाराचीही काळजी घ्यावी लागते. या आजारात एखादी छोटी चूकही तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करते.
नवी दिल्ली : मधुमेहाचा (diabetes) आजार आजच्या काळात झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषत: गेल्या दशकभरात भारतातील मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वाढते वय आणि कौटुंबिक इतिहासामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली (lifestyle changes) हे देखील या आजाराच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते. तुम्ही काय खाता आणि तुम्ही कोणत्या प्रकारची जीवनशैली जगता याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर (impact on health) होतो. तुमच्या रोजच्या छोट्या सवयींमुळे तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण सर्वजण नकळतपणे अथवा जाणूनबुजून अशा अनेक गोष्टी दररोज करत असतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह आहे, विशेषतः त्यांनी दैनंदिन जीवनातील प्रत्येक लहानसहान गोष्टीत काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा रक्तातील साखर कधी वाढेल समजणारही नाही.
मधुमेहाच्या रुग्णांना पांढरा ब्रेड खाणे सोडावे
बहुतांश भारतीय हे सकाळच्या नाश्त्यात पांढऱ्या ब्रेडचे सेवन करतात ज्यात कार्बोहायड्रेट भरपूर असते. रिफाईंड कार्ब्स मुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते, म्हणून त्यांचे सेवन मधुमेहामध्ये खूप हानिकारक असू शकते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी सर्व प्रकारच्या रिफाईंड कार्ब्सपासून दूर राहणे उत्तम ठरते, नाहीतर त्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. जर तुम्हालाही नाश्त्यात व्हाईट ब्रेड खाण्याची सवय असेल तर ती लगेच बदला. बिस्कीटे, पास्ता, मिठाई, केक, पेस्टी, भात आणि एनर्जी ड्रिंक्स यांच्यामध्येही रिफाईंड कार्ब्स असतात.
ब्रेकफास्ट न करणे ठरू शकते धोकादायक
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तर तुमच्या खाण्यापिण्याबरोबरच त्याची वेळ पाळणेही तितकेच महत्वाचे ठरते. या आजारात रुग्णांना जास्त वेळ पोट रिकामं न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच मधुमेहाने त्रस्त असेलल्या लोकांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. जेवणानंतर रात्री झोपणे, आणि सकाळी उठणे यात आठ ते दहा तासांचा कालावधी जातो, त्यानंतर बराच वेळ काही न खाण्याच्या सवयीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
या आजारात सतत बसून राहणेही चुकीचे
मधुमेहाच्या रुग्णांसाठी शारीरिक हालचाली आणि व्यायामही खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच घरात किंवा ऑफिसमध्ये सतत बसून राहण्याची सवय तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. 2021 मध्ये 4,75,000 हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की आळशी जीवनशैली जगणे आणि शारीरिक हालचाली न केल्याने लोकांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका 31 टक्क्यांनी वाढू शकतो. म्हमूनच मधुमेह नको असेल तर एका जागी सतत बसून काम न करता थोड्या-थोड्या वेळाने ब्रेक घेऊन चालावे, दिवसभरात हलका व्यायाम तरू करावा.
एकटेपणाही ठरतो धोकादायक
कोरोना महामारीच्या सुमारे एक वर्षानंतर अमेरिकेत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की दीर्घकाळ एकटेपणामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी सांगितले की जे लोक एकटे राहतात, त्यांचा इतर लोकांशी फारसा जवळचा संबंध नसल्यामुळे, त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असू शकतो.