Immunity Booster : ही हेल्दी ड्रिंक्स पावसाळ्यातही तुम्हाला ठेवतील स्ट्रॉंग
पावसाळ्याचा मौसम येताच विविध आजारही सोबत येतात. अशावेळी चांगली इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती हवी असेल तर काही ड्रिंक्स पिणे फायदेशीर ठरेल.
Immunity Booster : पावसाळ्याचा (monsoon) ऋतू येताच सर्वांना आनंद होतो. त्यामुळे गरमी कमी होते आणि वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण होतो. मात्र त्यासोबतच अनेक आजारांचा (diseases) धोकाही निर्माण होतो. ऋतूमानानुसार येणारे आजार नागरिकांना त्रस्त करू शकतात. यापासून वाचायचे असेल तर स्ट्रॉंग इम्युनिटी (strong Immunity) अर्थात रोगप्रतिकार शक्तीची गरज असते. यामुळे पाचन तंत्रही हेल्दी राहण्यास मदत होते.
तसेच त्याने मौसमी आजारांपासून बचाव होतो. त्यामुळे अशावेळी व्यायामासोबतच योग्य व सकस आहार घेणेही महत्वाचे ठरते. त्यासाठी तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्स रोज पिऊ शकता.
ही पौष्टिक पेयं आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात. तसेच आपले आजारांपासूनही संरक्षण करतात. ही हेल्दी ड्रिंक्स प्यायल्याने हायड्रेट राहण्यासही मदत होते.
हळदीचं दूध
हळद व दूध दोन्ही पौष्टिक पदार्थ. ते एकत्र करून प्यायाल्याने तर आणखीनच फायदा. हळदीच्या दुधाला गोल्डन दूधही म्हणतात. हळदीमध्ये करक्यूमिन असते, जे इम्युनिटी वाढवतं. हळदयुक्त दूध हे पचन संस्थेसाठीही फायदेशीर असते. त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेतही सुधारणा होते. झोपण्यापूर्वी तुम्ही हळद घातलेलं दूध पिऊ शकता.
लिंबू आणि आल्याचा चहा
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही लिंबू व आल्याचा चहा पिऊ शकता. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी अधिक असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते. तर आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. या दोन्हींचे मिश्रण असलेला चहा हा सर्दी व खोकल्यापासून आपले संरक्षण करतो.
ग्रीन स्मूदी
हिरव्या पालेभाज्या आणि फळांपासून ग्रीन स्मूदी बनवली जाते. यामध्ये तुम्ही लिंबूवर्गीय फळांचा तसेच बेरीजचाही समावेश करू शकता. ही स्मूदी क्रिमी बनवायची असेल तर त्यासाठी बदामाचे दूध तसेच नारळपाणीदेखील वापरू शकता. ग्रीन स्मूदी ही खूपच पौष्टिक असते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
आवळ्याचा रस
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते. आवळ्याचा रस प्यायल्याने इम्यून सिस्टीम मजबूत होते. आवळ्याचा रस किंवा ज्यूस घरीही सहज बनवता येतो. पावसाळ्यात हा रस प्यायल्याने अनेक आजारांपासून रक्षण होऊ शकते.
हर्बल टी
पावसाळ्यात हर्बल चहा पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हर्बल टी प्यायल्यामुळे रिलॅक्स वाटते. यामध्ये वनौषधींमुळे मौसमी आजारांपासून संरक्षण होते.