Kidney Stone Causing Vegetables | या ७ प्रकारच्या भाज्या किडनी स्टोनसाठी ठरतात कारणीभूत, शक्य असेल तर टाळाच
तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल किंवा तुम्हाला या आजारापासून बचाव करायचा असेल तर काही भाज्यांपासून दूर रहा. त्यांच्या सेवनाने किडनी स्टोनचा त्रास होण्याची किंवा ती समस्या आधीच असेल तर ती आणखी वाढण्याची शक्यता असते. त्या भाज्या कोणत्या हे जाणून घेऊया.
Kidney Stone Causing Vegetables : किडनी स्टोन (kidney stone) हा अतिशय गंभीर आजार आहे. स्टोनचा आकार छोटा असो वा मोठा, त्यामुळे बऱ्याच वेदना होऊ शकतात. अधिक कॅल्शिअम, यूरिक ॲसिड आणि ऑक्सलेट (Oxalate) यामुळे किडनीमध्ये स्टोन निर्माण होऊ शकतो. जेव्हा हे पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जात नाही, तेव्हा ते किडनी किंवा मूत्रमार्गात जमा होतात आणि स्टोनचे रूप धारण करतात. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास सतावत आहे का ? तसे असेल तर भरपूर पाणी पिण्यासोबतच तुम्हाला खाण्या-पिण्याकडेही नीट लक्ष दिले पाहिजे. दररोज खाल्ले जाणारे काही पदार्थ हे किडनी स्टोनचा त्रास वाढवू शकतात. एवढेच नव्हे तर तुम्ही या पदार्थांचे अतीप्रमाणात सेवन केले तर किडनी स्टोन होण्याचा धोका अधिकच वाढतो. हे पदार्थ म्हणजे ऑक्सलेटची भरपूर मात्रा असलेले पदार्थ.
ऑक्सलेट हे कोणकोणत्या भाज्यांमध्ये आढळते हे जाणून घेऊया. किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. त्यांच्यापासून दूर राहिल्याने स्टोन होण्याचा किंवा आधीच स्टोनचा त्रास असेल तर तो वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो. कोणकोणत्या भाज्यांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते व त्या खाणे का टाळले पाहिजे, ते समजून घेऊया.
किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरतात हे पदार्थ
नॅशनल किडनी फाउंडेशन (NKF) च्या रिपोर्टनुसार, ऑक्सलेट हे नैसर्गिक स्वरूपात अनेक खाद्यपदार्थांमध्ये आढळते. त्यामध्ये फळं, भाज्या, नट्स, बिया, धान्य, चॉकलेट व चहा यांचाही समावेश असतो.
या भाज्यांमध्ये आढळते भरपूर ऑक्सलेट
NKF नुसार, दररोज खाल्ल्या जाणाऱ्या काही भाज्यांमध्ये ऑक्सलेट मुबलक प्रमाणात असते. त्यांच्या अती सेवनाने किडनी स्टोन होऊ शकतो. त्यामुळे या भाज्यांचे एका ठराविक प्रमाणातच सेवन करणे उत्तम ठरते. या भाज्यांमध्ये पालक,बीट, स्विस चार्ड ( विशेष प्रकारची हिरवी पालेभाजी) , बटाटा, नेव्ही बिन्स, सोयाबीन यांचा समावेश असतो.
ऑक्सलेटने युक्त पदार्थ खाण्यामुळे होणार नुकसान
ऑक्सलेट हे कॅल्शिअम सारख्या मिनरल्सना बांधून ठेवण्याचे काम करते. एवढेच नव्हे तर शरीरातील त्याची पातळी वाढल्याने पचनसंस्थेला फायदेशीर पोषक द्रव्ये शोषून घेणे कठीण होते. यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया कमी होऊ शकतात.
किडनी स्टोन असणाऱ्यांनी काय खावे
केल, काजू, शेंगदाणे, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, ब्रोकोली, राजमा, ब्लूबेरीज, सुके अंजीर इत्यांदीमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी या पदार्थांचे सेवन केले तर ते फायदेशीर ठरू शकते.
किडनी स्टोनच्या रुग्णांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
– भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करा. दिवसभरात कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी प्यावे.
– पालक, बीट, जांभूळ, सुकामेवा,चहा यांच्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, त्यांचे अतिसेवन करणे टाळावे.
– कॅल्शिअम सप्लीमेंट्स घेणे टाळावे.
– प्रोटीनचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.
– जास्त मीठ खाणे टाळावे. अधिक सोडिअममुळे लघवीत कॅल्शिअम वाढते आणि स्टोन होण्याची शक्यताही वाढते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)