सायलेंट हार्ट ॲटॅक ठरू शकतो जीवघेणा, अशी ओळखा लक्षणे
पुरुषांच्या तुलनेत महिलांना सायलेंट हार्ट ॲटॅक येण्याचा धोका अधिक असतो. काही लोकांमध्ये त्याची लक्षणे वेळेवर दिसूनही येतात, मात्र किरकोळ दुखणे समजून लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात.
नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून देशात हृदयविकाराच्या (heart disease) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, हार्ट ॲटॅक (heart attack) हा सायलेंट असतो. म्हणजेच आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे रुग्णाला समजतच नाही. असे घडण्याचे कारण म्हणजे सायलेंट हार्ट ॲटॅकची (silent heart attack) लक्षणे सहज समजत नाहीत. अशा वेळी छातीत हलके दुखायला लागते, मात्र बरेचसे लोक त्याकडे गॅसेसची समस्या समजून दुर्लक्ष करतात.
10 नोव्हेंबर 2015 साली अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमधील एका अभ्यासानुसार, 45 ते 84 या वयोगटातील 2000 लोकांची तपासणी करण्यात आली. या काळात त्या लोकांना हृदयविकाराचा कोणताही त्रास नव्हता. पण सुमारे दशकभरात त्यापैकी 8 टक्के लोकांमध्ये मायोकार्डियल समस्या दिसून आली, म्हणजेच त्यांना हार्ट ॲटॅक आला होता. मात्र त्यापैकी 80 टक्के लोकांना ते कळलेच नाही, कारण तो सायलेंट आणि किरकोळ ॲटॅक होता.
मधुमेहाच्या रुग्णांना अधिक धोका
मधुमेहाच्या रुग्णांना सायलेंट हार्ट ॲटॅक धोका जास्त असतो. त्याचे कारण म्हणजे, मधुमेहाच्या बहुतेक सौम्य लक्षणे जाणवत नाहीत. कारण त्यांच्या नसा तितक्या रिॲक्टिव्ह नसतात आणि त्यांना वेदनांची जाणीव होत नाही. सायलेंट हार्ट ॲटॅकचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो. काही लोकांची वेदना सहन करण्याची क्षमता अधिक असते आणि त्यामुळे ते सौम्य वेदनांकडे, किंवा अस्वस्थतेकडे किरकोळ दुखणे समजून दुर्लक्ष करतात.
तर काही लोक असे आहेत ज्यांना हृदयविकाराच्या सौम्य लक्षणांबद्दल माहिती नसते. विशेषतः जेव्हा थोड्या काळासाठी वेदना होतात तेव्हा हे लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. गॅसेसचा त्रास समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हळूहळू हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज वाढत जाते. जेव्हा ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त वाढते, तेव्हा अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि अशा अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूचा धोका अधिक संभवतो.
सायलेंट हार्ट ॲटॅक येऊ शकतो, हे कसे समजावे ?
जेव्हा तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीच्या मध्यभागी 20-25 मिनिटे तीव्र वेदना होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. अशा परिस्थितीत ईसीजी करावा, त्याला जास्त वेळ लागत नाही आणि ते फार खर्चिकही नसते.
या लोकांनी रहावे सावध
मधुमेहाव्यतिरिक्त, लठ्ठपणा, हार्ट ॲटॅकचा कौटुंबिक इतिहास, हाय ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉलची पातळी, खराब जीवनशैली आणि धूम्रपान किंवा मद्यपान यामुळे सायलेंट हार्ट ॲटॅक येण्याचा धोका असू शकतो. अशा लोकांना सायलेंट हार्ट ॲटॅक येण्याचा धोका अधिक असतो. जर पहिल्या सायलेंट हार्ट ॲटॅक बद्दल कळले नसेल तर दुसऱ्या वेळी धोका वाढू शकतो व तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सायलेंट हार्ट ॲटॅकच्या लक्षणांबाबत प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. आणि ज्या व्यक्तींना त्याचा जास्त धोका आहे त्यांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)