रक्ताची कमतरता असेल तर महिलांमध्ये दिसतात ही लक्षणं, दुर्लक्ष करणे पडेल महागात
महिलांना ॲनिमियाचा म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असण्याचा त्रास होत असेल तर त्याची अनेक लक्षणे दिसतात. डोकेदुखी, भूक कमी लागणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये.
नवी दिल्ली |30 ऑगस्ट 2023 : ॲनिमिया हा एक ब्लड डिसऑर्डर (blood disorder) आहे. या आजारामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. हा आजार कोणालाही होऊ शकतो. मात्र महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसते. रक्तात रेड सेल्स आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याने हा आजार होतो. आहाराकडे नीट लक्ष न दिल्यानेदेखील ॲनिमिया (Anemia) आजार होतो. विशेषत: आहारात फॉलिक ॲसिड आणि लोहाची कमतरता असेल तर हा त्रास होऊ शकतो. महिलांमध्ये गरोदरपणात ॲनिमियाच्या केसेस बऱ्याच पहायला मिळतात.
ॲनिमियामुळे अशक्तपणा, थकवा येणे, डोकेदुखी आणि भूक कमी लागणे ही लक्षणे दिसू लागतात. एखाद्या महिलेला हा सर्व त्रास होत असेल तर त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्यास तब्येत बिघडू शकते. गर्भधारणेदरम्यान ॲनिमिया झाला असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. हा आजार अनुवांशिक कारणांमुळेही होऊ शकतो. अशा परिस्थितीत तो हलक्यात घेऊ नये.
गंभीर होऊ शकतात लक्षणे
ज्येष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ॲनिमियामुळे महिलांची तब्येत बिघडू शकते. तसेच अन्य आजारही होण्याची शक्यता असते. लोह, व्हिटॅमिनची कमतरता आणि क्रॉनिक आजारांमुळेही ॲनिमिया होऊ शकतो. काही स्त्रियांमध्ये, ॲनिमियाची लक्षणे तीव्र देखील असू शकतात. यादरम्यान तोंडात फोड येणे, त्वचा पिवळी पडणे, डोळे निळे पडणे आणि चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा होतो. अशा परिस्थितीत आहाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
या पदार्थांचा आहारात करा समावेश
नैसर्गिक पद्धतीने रक्ताची कमतरता दूर करायची असेल तर मनुका, अंजीर, काजू, अक्रोड, अंडी, व्हिटॅमिन बी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्याशिवाय फॉलिक ॲसिडही खूप महत्वाचे असते. ॲनिमिया पासून वाचायचे असेल फॉलिक ॲसिडचे सेवन महत्वाचे असते. त्यासाठी पालक, ब्रोकोली, बीन्स व शेंगदाणे खावेत.
या गोष्टींची घ्या काळजी
– शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेळोवेळी तपासत राहा
– मद्यपा करू नका
– धूम्रपान करण्यची सवय देखील हानिकारक ठरू शकते.
– व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन वाढवा.
– जेवणासोबत चहा पिणे टाळा.
– मानसिक ताण घेणे टाळा
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)