Health Tips: ‘या’ टिप्सच्या मदतीने ब्रेस्ट कॅन्सरची जोखीम होऊ शकते कमी
भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाचा कर्करोग) प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे.
नवी दिल्ली – भारतात ब्रेस्ट कॅन्सरची (स्तनाचा कर्करोग) प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, 2025 पर्यंत, दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाच्या (breast cancer) रुग्णांची संख्या 2.32 लाखांपेक्षा जास्त असू शकते. महिलांनी (women) कोणत्याही किंमतीत ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. या आजारातून बरं होण्यासाठी रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेणे महत्त्वाचे आहे. तसेच ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी आणि आपल्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी योग्य तपासणी (tests) करणेदेखील आवश्यक आहे.
ब्रेस्ट कॅन्सर हा स्तनाच्या कोणत्याही भागात सुरू होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर हे स्त्रियांच्या उच्च मृत्यूदराचे कारणही ठरू शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सुरूवातीच्या (काळातील) तपासणी आणि (रोगाची) ओळख हे महिलांसाठी जगण्याचा दर सुधारण्यास मदत करू शकतात. योग्य वजन राखणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. जास्त वजनामुळे ब्रेस्ट कॅन्सरसह इतर अनेक कॅन्सरचा धोकाही वाढतो.
योग्य आहार
निरोगी आहारामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. मद्यपान कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि भरपूर फळे व भाज्या खाव्यात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, कमी दारू प्यायली तरीही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
धूम्रपान करू नका
धूम्रपान केल्यामुळे आरोग्याच्या इतर अनेक धोक्यांसह, ब्रेस्ट कॅन्सरसह इतर 15 विविध प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते लवकरात लवकर सोडावे.
स्तनपान
एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. यासोबतच हे लहान बाळांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठीही खूप फायदेशीर आहे.
तुमचा कौटुंबिक इतिहास जाणून घ्या
कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. म्हणूनच स्त्रियांनी त्यांचा कौटुंबिक इतिहास समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुमच्या आईला किंवा बहिणीला स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कॅन्सर झाला असेल, तर तुम्हाला त्याचा धोका जास्त असतो.
मॅमोग्राम स्कॅनिंग
ब्रेस्ट कॅन्सरसाठी मेमोग्राम स्कॅनिंग केल्याने जीव वाचू शकतो. यामुळे कॅन्सरला प्रतिबंध होत नाही पण कॅन्सर झाल्यास त्याबद्दल लवकर कळते व उपचार करता येतात. वयाच्या 40 व्या वर्षांनंतर, बहुतांश स्त्रियांनी दरवर्षी मेमोग्राम स्कॅनिंग तपासणी केली पाहिजे. ज्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो त्यांना लवकर तपासणी करणे आवश्यक ठरते.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)