Weight Loss Tips : कमी झोप ते नाश्ता न करणे… अशा वाईट सवयींमुळे वजन कमी होण्यास होतो विलंब
वजन कमी करण्यासाठी लोक अनेक टिप्स फॉलो करतात. पण काही सवयींमुळे तुमची मेहनत वाया जाऊ शकते.
नवी दिल्ली – वजन कमी करणे ही अतिशय कठीण आणि आव्हानात्मक प्रक्रिया आहे. वजन कमी करण्यासाठी (weight loss) अनेक लोकं या किचकट प्रक्रियेतून जातात. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार, नियमित व्यायाम (exercise) आणि सकारात्मक मानसिकता हे आवश्यक आहे, परंतु त्याशिवाय आपल्या इतर सवयी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. अनेक वेळा असं होतं की सर्व आवश्यक गोष्टींचे पालन करूनही व्यक्ती वजन कमी करू शकत नाही. याचे कारण तुमच्या काही सवयी (unhealthy habits) असू शकतात, ज्याचा तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही आजकाल तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची मेहनत वाया जाऊ शकते.
पुरेशी झोप न घेणं
आजकाल उशिरा उठणे हा लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. जर तुम्ही ऑफिसचे काम, अभ्यास किंवा इतर कोणत्याही कारणामुळे उशिरापर्यंत जागे राहत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या वजन घटण्यावर होऊ शकतो. खरंतर, पुरेशी झोप न मिळाल्याने तुमची भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो. तसेच, तुमची उर्जा पातळी देखील कमी होते आणि तणाव पातळी वाढते, ज्यामुळे तुमची भूक आणि साखरेची इच्छा वाढते. म्हणूनच रात्री 7 ते 9 तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय रोज संध्याकाळी 6 वाजेपूर्वी जेवण्याचा प्रयत्न करा आणि नियमित व्यायाम करा.
जेवताना अधिक पाणी पिणे
पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. चमकणारी त्वचा, इन्फेक्शनपासून संरक्षण, स्मरणशक्ती वाढवणे, थकवा दूर करणे आणि भूक नियंत्रित करणे यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. पण तुम्ही जेवताना जास्त पाणी पीत असाल तर त्याचा तुमच्या वजन कमी होण्यावर वाईट परिणाम होतो. जेवताना पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिडवर परिणाम होतो, ज्यामुळे पचन बिघडते. त्यामुळे जेवण करताना मर्यादित प्रमाणात पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच, चांगल्या पचनासाठी, जेवण्यापूर्वी 30 मिनिटे आधी पाण्याचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा.
सकाळी नाश्ता न करणे
सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. पण जर तुम्ही तुमचा सकाळी नाश्ता करणे टाळत असाल किंवा वगळत असाल तर ते वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर, सकाळचा नाश्ता वगळला तर दिवसभर भूक लागते व जास्त खाल्ले जाते. यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी तर घसरतेच पण मेटाबॉलिज्म देखील कमजोर होते. याचा तुमच्या वजन कमी करण्यावर खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मेटाबॉलिज्म हे शरीरातील कॅलरीज बर्न करते आणि अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करते. त्यामुळेच सकाळी हेल्दी नाश्ता करणे महत्वाचे आहे, ज्यायोग तुम्ही दिवसभरात जास्त खाणं टाळू शकाल.
दिवसभर स्नॅक्स खाणे
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दिवसभरात सतत काहीतरी खाण्याची सवय सोडा. खरं तर, जेव्हा आपण दिवसभरात काही ना काही खात असतो तेव्हा ते इन्सुलिनची पातळी वाढवते, जे शरीरात चरबी जमा होण्याचे लक्षण आहे. इतकेच नाही तर अनेक स्नॅक्समध्ये आवश्यक ती प्रोटीन्स नसतात, जे आपल्या शरीराला फॅट बर्निंग मोडमध्ये ठेवतात. अशा स्थितीत दिवसभर स्नॅक्स खाल्ल्याने तुम्हाला तुमचे वजन हवे असले तरी कमी करता येणार नाही.