नवी दिल्ली – हिवाळ्यात भजी, समोसे असे तळलेले किंवा चटकमटक पण अनारोग्यकारक (unhealthy food) पदार्थ खाण्याची क्रेझ थोडी वाढते. या गोष्टी आपण अगदी मनसोक्त खातो, पण ते खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना काही वेळातच पोटदुखी किंवा अपचनाचा (indigestion) त्रास होऊ लागतो. अनेक लोकांच्या पोटाशी संबंधित तक्रारी वर्षानुवर्षे सुरु असतात. त्यापासून मुक्त होण्यासाठी सतत औषधं घेत राहिलो तर त्याच्या साइड इफेक्ट्सचा धोका देखील वाढतो. अशा परिस्थितीमध्ये काही घरगुती उपायांनी हा त्रास कमी होऊ शकतो. आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हे पेय केवळ पोटातील गॅसेस (gases) आणि अपचनाची समस्याच दूर करत नाही तर मेटाबॉलिज्म सुधारण्यासही मदत होते.
ते पेय कोणते आहे आणि ते कसे तयार करावे हे जाणून घेऊया.
कृती
– एका भांड्यात एक लीटर पाणी उकळावे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घालावी. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा धने टाकावे. ते मिश्रण एकत्र करून त्यामध्ये थोडसं आलं किसून घालावे व लिंबाचा रस मिसळावा. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करावे. हे सर्व मिश्रण फ्लास्क किंवा थर्मासमध्ये घालून ठेवावे.
असा करा वापर
तुम्ही हे मिश्रण थर्मासमध्ये घालून दिवसभर तुमच्यासोबत ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते पिऊ शकता. गरमागरम हे पेय प्यायल्याने तुमची पोटाची समस्या दूर होईल आणि तुम्ही औषधांशिवाय निरोगी आणि तंदुरुस्तही राहू शकाल.
याचे अन्य फायदे
आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या पेयाच्या सेवनाने पोटात गॅस निर्माण होणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर या समस्या तर दूर होतातच, त्याशिवाय आपले मेटाबॉलिज्मही वाढण्यास मदत होते. एवढेच नाही तर हे पेय सेवन करून आपण शरीर सहज डिटॉक्स करू शकतो. अशाप्रकारे, वजन कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील हे पेय खूप उपयुक्त ठरू शकते.