Unique Blood group: गुजरातमधील व्यक्तीचा रक्तगट सर्वात दुर्मिळ, जगात अवघ्या 10 जणांचे रक्त होते मॅच
गुजरातमधील एका व्यक्तीचा रक्तगट अतिशय दुर्मिळ असल्याची माहिती समोर आली आहे. ईएमएम निगेटिव्ह असा त्याचा रक्तगट असून जगभरात अवघ्या 10 व्यक्तींचे रक्त त्याच्याशी मॅच होते.
आपल्या शरीरातील रक्ताचे A, B, O, AB असे चार प्रमुख रक्तगट (Blood Group)असतात. आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास, त्याच्या रक्तगटाशी जुळणारे रक्त त्याला चढवले जाते. मात्र गुजरातमध्ये (Gujrat) एका व्यक्तीच्या शरीरात या चार रक्तगटाव्यतिरिक्त वेगळाच, दुर्मिळ रक्त ( Unique Blood group)आढळला असून, जगभरात या रक्तगटाची अवघी 9 माणसे आहेत. त्यामुळे हा दुर्मिळ रक्तगट असणारी ती भारतातील पहिली तर देशातील 10वी व्यक्ती ठरली आहे. हा रक्तगट नेमका कोणता आणि तो कोणत्या कारणामुळे दुर्मिळ ठरतो हे जाणून घेऊया.
रक्तगट अतिशय दुर्मिळ
या व्यक्तीच्या शरीरात आढळलेला ईएमएम निगेटिव्ह हा रक्तगट अतिशय दुर्मिळ असून जगभरात अवघ्या 9 लोकांच्या शरीरात तो आढळतो. या व्यक्तीला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वी रक्ताची तरतूद करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला असता त्याच्याशी जुळणारे रक्त कुठेही सापडले नाही. त्यानंतर या व्यक्तीचे, तसेच त्यांच्या नातेवाईकांचे रक्त तपासणीसाठी न्यूयॉर्कमधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता या व्यक्तीचा रक्तगट अतिशय दुर्मिळ असल्याचे समोर आले. मात्र यामध्ये संपूर्ण वर्षभराचा कालावधी गेला. दरम्यान या व्यक्तीचा गेल्या महिन्यात नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे समजते.
व्यक्तीसह जगभरात अवघ्या 10 व्यक्ती
सर्वसाधारणपणे आपल्या शरीरात चार गट असतात. ज्यामध्ये A, B, O, AB आणि आरएच व डफी सारख्या 40 हून अधिक प्रणाली आणि 350 हून अधिक ॲंटिजन असतात. या व्यक्तीचा रक्तगट AB+ असून त्याची फ्रिक्वेन्सी ईएमएम निगेटीव्ह आहे. गुजरातमधील या व्यक्तीसह जगभरात अवघ्या 10 व्यक्ती आहेत, ज्यांच्या रक्तात ईएमएम हा हाय फ्रिक्वेन्सी ॲंटिजन नाही. त्यामुळे त्यांचे रक्त सामान्य रक्तगटांपेक्षा वेगळे आणि दुर्मिळ ठरते. असा दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्ती ना कोणाला रक्त देऊ शकतात , ना कोणाचेही रक्त घेऊ शकतात. अशा प्रकारच्या रक्तामध्ये ईएमएमची कमतरता असल्याने या रक्तगटाला `ईएमएम निगेटिव्ह` असं नाव देण्यात आलं आहे. यामुळे अत्यंत दुर्मीळ रक्तगट असलेल्या जगभरातल्या व्यक्तींच्या यादीत एका भारतीय व्यक्तीचा प्रथमच समावेश झाला.