थायरॉइडचा डिमेंशियाच्या वाढत्या जोखमीशी संबंध – संशोधन
हायपोथायरॉईडीझम असलेल्या वृद्धांना डिमेंशिया (स्मृतीभ्रंशाचा) होण्याचा धोका वाढू शकतो.
हायपोथायरॉईडीझम असलेल्या वृद्ध व्यक्तींना स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेंशिया (dementia) होण्याचा धोका वाढू शकतो, असे अमेरिकेन ॲकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात नमूद करण्यात आले आहे. हायपोथायरॉईडीझम याला अंडरॲक्टिव्ह थायरॉईड (underactive thyroid) असेही म्हटले जाते. 6 जुलै 2022 रोजी न्यूरोलॉजीच्या ऑनलाइन अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखातील अभ्यासात हे नमूद करण्यात आले आहे. ज्या लोकांच्या थायरॉईडच्या (thyroid) स्थितीत थायरॉईड हार्मोन बदलण्याची औषधे आवश्यक आहेत त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका अधिक असतो.
जेव्हा थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉईड हार्मोन (संप्रेरक) तयार करत नाही तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. यामुळे मेटाबॉलिजम संथ अथवा मंद होऊ शकते. खूप थकवा जाणवणे, वजन वाढणे आणि थंडीबद्दल संवेदनशीलता ही याची लक्षणे असू शकतात.
रोड आयलंडमधील प्रोव्हिडन्स येथील ब्राऊन युनिव्हर्सिटीतील लेखक चिएन-हसिअँग वेंग यांच्या सांगण्यानुसार, काही केसेसमध्ये थायरॉईड विकाराचाा डिमेंशियाशी संबंध असू शकतो, आढळून आले. मात्र उपचारांच्या सहाय्याने ते उलट होऊ शकते, असे ते म्हणाले. मात्र या निष्कर्षांबाबत आणखी पुष्टी होण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकांमध्ये थायरॉईडच्या समस्यांबद्दल अधिक जागरूकता निर्माण केली पाहिजे, कारण (थायरॉईड) हे डिमेंशिया साठी जोखमीचा घटक ठरू शकतो.
या अभ्यासासाठी संशोधकांनी तैवानमध्ये (नव्याने डिमेंशियाचे निदान झालेल्या) 7,843 लोकांच्या आरोग्याच्या नोंदींचा अभ्यास केला आणि ज्या लोकांना डिमेंशिया नाही, त्याच्याशी तुलना केली. त्यांचे सरासरी वय 75 इतके होते. यामध्ये कोणत्या व्यक्तीला हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझमचा इतिहास आहे का, याचाही संशोधकांनी शोध घेतला.
हायपरथायरॉईडीझम, याला ओव्हरॲक्टिव्ह थायरॉईड असेही म्हणतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त हार्मोन तयार करते, तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. यामध्ये मेटाबॉलिज्म वाढू शकते. वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा अनियमित होणे आणि अस्वस्थता अथवा एंक्झायटी यांचा त्याच्या लक्षणांमध्ये समावेश होतो.
त्यामध्ये एकूण 102 लोकांना हायपोथायरॉईडीझम आणि 133 लोकांना हायपरथायरॉईडीझम होता. दरम्यान, संशोधकांना हायपरथायरॉईडीझम आणि डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) यांच्यात कोणताही संबंध असल्याचे आढळले नाही.
डिमेंशिया (स्मृतीभ्रंश) नसलेल्या 34 लोकांच्या ( 0.4%) तुलनेत डिमेंशिया असलेल्या लोकांपैकी, 68 लोकांना (0.9% लोकं) हायपोथायरॉईडीझम होता. हायपोथायरॉईडीझम असलेल्या 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता त्याच वयाच्या लोकांपेक्षा (ज्याना थायरॉईड नाही) 80% जास्त असल्याचे आढळून आले.