मुंबई: अन्न भविष्याची पुनर्कल्पना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निर्दिष्ट प्रमाणात अन्नधान्याची (Food) उपलब्धता करण्यात भारताने यशस्वी पल्ला गाठला आहे. रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करण्याद्वारे संतुलित आहारासाठी आरोग्यदायी, पौष्टिक पदार्थांची उपलब्धता सुनिश्चित करणे हे भारतासाठी (India) आगामी लक्ष्य असणार आहे. विज्ञान (Science) आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन तसेच खाण्यापिण्याच्या सवयीत अमुलाग्र बदल घडले आहेत. हवामान बदल आणि साथीच्या रोगांसारख्या आव्हानांना तोंड देताना भारताला अधिकाधिक सुरक्षित, शाश्वत आणि प्रमाणबद्ध अन्न व्यवस्थेची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर, कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि जनुकीय सुधारित अन्न भारताला अन्न सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य स्वयंपूर्णता निर्माण करण्यास आणि पौष्टिक प्रथिनांची गुणवत्ता आणि किफायतशीर क्षमता वर्धित करण्यास सहाय्यक ठरू शकते.
सर्वोत्तम दर्जाचे अन्न निर्माण करण्यासाठी विज्ञान-आधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मी GM खाद्यान्याच्या निर्मितीसाठी जनुकीय अभियांत्रिकीचा संदर्भ दिला आहे. तुम्ही अन्नाचे प्रमाण आणि दर्जा वाढवण्यासाठी उत्पादनाच्या पारंपारिक पद्धती वापरत असताना वर्तमान काळात जर तुम्ही अन्न पदार्थात विशिष्ट खनिजे आणि पोषण समाविष्ट करू इच्छित असल्यास जनुकीय अभियांत्रिकी आणि नुकतेच विकसित जीनोम एडिटिंगचे तंत्रज्ञान प्रचलित असल्याचे मत यसीएआर-नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्लीचे माजी संचालक प्रा.के.सी.बन्सल यांनी व्यक्त केले आहे.
जनुकीय अभियांत्रिकीयुक्त अन्नपदार्थांची भारतासाठी उपयुक्तता अधोरेखित करताना डॉ.बन्सल यांनी सरकारने शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली आहे. “भारतात तेलबिया आणि कडधान्य पिकांवर अधिक भर देण्याची गरज आहे. चणे आणि तूर सारख्या कडधान्यांवर खोड पोखरीचा (एच. आर्मिगेरा) प्रतिकूल परिणाम होतो. यासारख्या अन्य पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनुवांशिक सुधारणा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे आणि भारत सरकारने हे तंत्रज्ञान शेतकऱ्याना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असण्याची गरज आहे. या विनाशकारी कीटक आणि रोगकारकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार आहे. त्यामुळे, जीएम तंत्रज्ञान केवळ अन्नाचे प्रमाणच नाही तर त्याचा दर्जाही वाढवण्यास मदत होईल,” असे मत प्रा. बन्सल यांनी व्यक्त केले आहे.
कीटकांशी सामना करण्याव्यतिरिक्त, खाद्य विज्ञानाचा फोर्टिफाइड आणि पौष्टिक प्रथिनेयुक्त अन्न पर्याय प्रदान करण्यात मोठा उपयोग आहे. भारताच्या पोषण सुरक्षेच्या प्रवासात हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. समाज, उद्योग आणि सरकारने संयुक्तिकपणे अन्न शास्त्राचा उपयोग करायला हवा. जेणेकरून माफक खर्चात अन्न तयार करता येईल. हे ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योग्य अन्न निवडी लागू करण्यात मदत करू शकते. अन्न शास्त्राचा वापर अत्यंत आश्वासक आहे. वनस्पती-आधारित मांसासारख्या उत्पादनांना प्राधान्य मिळत आहे. ही नाविन्यपूर्ण उत्पादने सर्वांच्या पसंतीस उतरत असून अनेकांनी आहाराचा भाग बनविण्यास प्राधान्य दिलं आहे” , दी गुड फूड इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक वरुण देशपांडे यांनी म्हटलं आहे.
न्यूट्रिवेल हेल्थ इंडियाच्या संस्थापक ख्यातनाम पोषणतज्ञ डॉ. शिखा शर्मा यांनी अन्न विज्ञानाचा वापर अन्न प्रक्रिया, साठवण आणि वाहतूक या बाबतीत होणारा अपव्यय देखील कमी करू शकतो असं मत व्यक्त केलं आहे.
“भाज्यांसारख्या ताज्या उत्पादनांपैकी अंदाजित 60 टक्के योग्य साठवणूक क्षमतेच्या अभावी आणि संरक्षण पदार्थांचा वापर न केल्यामुळे खराब होतात. अयोग्य साठवणुकीच्या पद्धतीमुळे उंदरांनी तब्बल दोन टन धान्य खराब केले आहे. अन्न साठवणूक, प्रक्रिया आणि वितरणासाठी वैज्ञानिक तंत्रांचा समावेश केल्यास अन्नसुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल” अशी अपेक्षा डॉ शिखा शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
मर्यादित संसाधनांसह अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञान सक्षमीकरणाची अपेक्षा प्रा. बन्सल यांनी व्यक्त केली आहे. “बीज हे अन्न उत्पादनासाठी एक मूलभूत घटक आहे. जीनोम एडिटिंगसारखे नवीन तंत्रज्ञान कमी कृषी रसायने आणि कमी जमीन, पाणी आणि खते वापरून उत्कृष्ट उत्पादन देण्यासाठी बियाणे वाढविण्यास सक्षम आहेत. जर भारताला नजीकच्या भविष्यात अन्नधान्याचे उत्पादन 300 दशलक्ष टनांच्या पुढे वाढवायचे असेल, विशेषत: शाश्वत पद्धतीने, तर आपल्याला या चांगल्या चाचणी केलेल्या आणि सिद्ध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज बन्सल व्यक्त करतात. अन्न शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या आश्वासक वाटचालीमुळे भारताचं अन्न भविष्य समृद्ध असल्याचं अधोरेखित होतं.