Diabetes : किडनीच्या आजारासह ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करणे आहे सोपे, जाणून घ्या शुगर नियंत्रित करण्याच्या 7 टिप्स
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे थोडे गुंतागुंतीचे होते. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्याचे उपाय जाणून घ्या.
मुंबई : डायबिटीस (Diabetes) म्हणजेच मधुमेह हा एक जुना आणि गंभीर आजार आहे. दरवर्षी लाखो लोकं मधुमेहाची शिकार होतात. भारत असा एक देश आहे जिथे मधुमेहाचे 77 लाख रुग्ण आहेत. तथापि जगभरात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण चीनमध्ये आहेत. रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर लेव्हल (blood sugar level) नियंत्रणात ठेवणे कोणत्याही मधुमेहाच्या रुग्णासमोरील मोठे आव्हान असते. जीवनशैलीत बदल करून ही पातळी नियंत्रणात ठेवता येते. हाय ब्लड शुगर लेव्हल वेळीच नियंत्रणात न ठेवल्यास हार्ट ॲटॅक आणि किडनी निकामी (kidney disease) होण्याचा धोका वाढतो. विशेषत: जे लोक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे फार कठीण होते. मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रस्त असताना आपल्या रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी हे जाणून घेऊया.
किडनीच्या आजारात शुगर लेव्हल नियंत्रणात कशी ठेवाल ?
अलीकडच्या काळात भारतात मधुमेहाशी संबंधित मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजारांचे ओझे लक्षणीयरीत्या वाढले आहे. मधुमेहामुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांचे खूप नुकसान होते व त्या अशक्त होतात. त्यामुळे कमकुवत किडनी शरीरातील विषारी पदार्थ आणि घाण बाहेर टाकण्यास असमर्थ ठरते. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी ब्लड शुगर लेव्हलबद्दल अधिक सतर्क राहिले पाहिजे.
पौष्टिक आहार आणि वेळेवर जेवण करणे –
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवायची असेल दिवसभरात 3 वेळा जेवण आणि जेवणादरम्यान 2 वेळेस स्नॅक्स खाणे गरजेचे आहे. दोन जेवणांदरम्यान 6 तासांपेक्षा अधिक अंतर असू नये. साखरेचे नियमित सेव करणे टाळावे, त्यामध्ये अधिक कॅलरीज असतात. साखरेला पर्याय म्हणून शुगर-फ्री वापरू शकता. तसेच कोल्ड-ड्रिंक्स, डबाबंद खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
रोज ब्लड शुगर लेव्हल चेक करा –
जर तुम्ही औषधे घेत असाल तर नियमितपणे ब्लड शुगर लेव्हल चेक करावी. ब्लड शुगर लेव्हल नेहमी नियंत्रणात असावी. खूप कमी किंवा खूप वाढलेली ब्लड शुगर लेव्हल तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
कोलेस्ट्ऱॉलवर लक्ष ठेवा
मधुमेहाच्या रुग्णांनी ब्लड शुगर लेव्हल सोबतच कोलेस्ट्रॉलवर नजर ठेवणेही गरजेचे आहे. ते वाढल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा व ते नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध घ्यावे.
प्रक्रिया केलेले व हाय- कॅलरी फूड टाळा –
प्रक्रिया केलेले व हाय- कॅलरी फूड कोणासाठीच चांगले नसते. पण जर तुम्ही किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर अशा पदार्थांपासून कटाक्षाने दूर रहा. या पदार्थांऐवजी हिरव्या भाज्या, फळं, डेअरी पदार्थ खावेत.
पोटॅशिअम व फॉस्फरसचे सेवन कमी करा –
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी प्रमाणात पोटॅशिअम व फॉस्फरसचे सेवन करावे. क्रोनिक किडनीचा त्रास असेल तर रक्तात या दोन घटकांचे अधिक प्रमाण असणे हृदयासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतात. फायबरचे सेवन वाढवावे.
जेवणात जास्त मीठ घालू नका –
जास्त साखर आमि जास्त मीठ आरोग्यासाठी चांगली नाही. किडनीचा आजार असेल तर हे पदार्थ कटाक्षाने कमी खा. मीठाचे प्रमाण कमी करा. जेवताना वरतून मीठ घालणे बंद करा.
शारीरिक हालचाली वाढवा –
मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. हालचाल तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरते. 30 मिनिटे धावणे किंवा चालणे हे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. तसेच डोकं शांत ठेवण्यासाठी योगासनेही करावीत.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )