Mouth Ulcers Remedies : तोंडात वारंवार येणाऱ्या फोडांमुळे वैतागलात ? या घरगुती उपायांनी मिळू शकेल आर
तोंडातील फोडांमुळे बराच त्रास होतो, काही खाणं-पिणंही मुश्किल होतं. काही घरगुती उपायांनी हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
नवी दिल्ली – तोंडात येणारे अल्सर किंवा फोड (mouth ulcer) ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे लोक अनेकदा त्रस्त असतात. पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येमुळे अनेकदा तोंडात फोड येऊ लागतात. या फोडांमुळे खाणे-पिणे तर सोडाच बोलणेही कठीण होते. तोंडाच्या आत, जिभेवर, हिरड्यांवर, ओठांवर कुठेही हे फोड येऊ शकतात. मसालेयुक्त, तिखट पदार्थांचे अतिसेवन, अयोग्य आहार, पुरेशी झोप न घेणे, उष्ण पदार्थ जास्त खाणे (unhealthy habits, spicy food) यामुळे वारंवार फोड येऊ शकतात. ही एक अतिशय वेदनादायक समस्या (pain) असून त्यामुळे खाणे-पिणे देखील कठीण होते. जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल आणि यापासून लवकर सुटका हवी असेल तर काही घरगुती उपाय करून पाहू शकता.
मध
अनेक गुणांनी समृद्ध असलेला मध हा तोंडातील फोडांच्या समस्येवरही गुणकारी ठरू शकतो. त्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म हे फोडांधील बॅक्टेरिया नष्ट करण्यास प्रभावी ठरतात. त्यामुळेच तुम्हालाही तोंडातील फोडांचा त्रास होत असेल तर एका कापसाच्या बोळ्यावर थोडा मध लावून तो फोड आलेल्या जागी लावल्यास आराम मिळू शकतो.
तुरटी
तोंडाच्या अल्सरपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुरटीचाही वापर करू शकता. जर तुम्हाला फोडांचा त्रास होत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा तुरटी मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा त्या पाण्याने तोंड धुवा. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल.
हळद
औषधी गुणधर्मांनी युक्त असलेली हळद अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरते. तोंडातील अल्सरच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचाही वापर करू शकता. यासाठी एका ग्लास पाण्यात दोन चमचे हळद टाकून उकळा. हे पाणी थंड झाल्यावर त्याने चूळ भरा, त्यामुळे लौकर आराम मिळेल.
तूप
तोंडाच्या अल्सरपासून लवकर आराम मिळवण्यासाठी तुम्ही देशी तूप वापरू शकता. तूप हे अल्सरसाठी अत्यंत गुणकारी मानले गेले आहे. तोंडातील फोड दूर करण्यासाठी एका बोटाला थोडे तूप लाऊन ते फोडांवर लावा आणि थोडावेळ तसेच राहू द्या. या उपायाने तुम्हाला अल्सरच्या समस्येपासून लवकर आराम मिळेल.
बर्फाचा तुकडा
जेव्हा तोंडात व्रण होतात तेव्हा अनेकदा वेदना आणि जळजळ जाणवते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फोड आले असतील तर तुम्ही यासाठी बर्फाचे तुकडे वापरू शकता. फोडांवर बर्फाचा तुकडा ठेवल्याने जळजळ होण्यापासून आराम मिळेल. यासोबतच फोड जास्त वाढणार नाहीत. दिवसातून तीन ते चार वेळा असे केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.