Stomach Worms Remedies: पोटातील जंतांमुळे मुलं झाली हैराण ? करून पहा हे घरगुती उपाय
लहान मुलं अनेकदा पोटाशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतात. पोटातील जंत ही त्यातीलच एक समस्या आहे. जर तुमच्या मुलांनाही जंताचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही यापासून सुटका करू शकता.
नवी दिल्ली – चांगल्या आरोग्यासाठी चांगली जीवनशैली (healthy lifestyle) अतिशय महत्वाची आहे. आपल्या काही सवयींमुळेच आपण अनेक समस्यांना तोंड देत असतो. विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पोटात होणारे जंत (stomach worms)हीदेखील त्यापैकीच एक समस्या आहे, ज्याचा त्रास जवळपास प्रत्येक मुलाला कधी ना कधी होतोच. मुलांना भूक न लागणे, पोट खराब होणे किंवा पोटात खालच्या भागात दुखणे, असा (stomach problems)त्रास मुलांना होतो. मात्र बऱ्याच वेळेस पालक त्याकडे साधारण समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर ठरू शकतं.
जर तुमच्या मुलांनाही वारंवार पोटाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल तर पोटातील जंत त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही यापासून सुटका करू शकता.
कच्ची पपई
पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पपई खूप फायदेशीर मानली जाते. पपईचे सेवन केल्याने पोटातील वाईट जंत नाहीसे होतात. जर तुमचे मूलही पोटातील जंतांच्या समस्येमुळे त्रस्त असेल एक चमचा कच्च्या पपईचा रस हा 4-5 चमचे कोमट पाण्यात मिसळा. त्यामध्ये एक थेंब मध टाका आणि हे मिश्रण मुलांना सकाळी रिकाम्या पोटी प्यायला द्या. अथवा तुम्ही पपईच्या बिया बारीक करून एक ग्लास कोमट पाणी किंवा दुधासह मुलांना देऊ शकता.
नारळ
पोटातील जंतांच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल हा एक उत्तम पर्याय आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक बाहेर पडतात. यासोबतच पोटातील जंतही पूर्णपणे नष्ट होतात. जर तुमचे मूल या समस्येने त्रस्त असेल तर त्यांच्यासाठी नारळ पाणी किंवा खोबरेल तेल दोन्ही फायदेशीर ठरू शकते. याशिवाय एक चमचा किसलेले खोबरे खाणे किंवा 3-4 चमचे खोबरेल तेल पिणे देखील फायदेशीर ठरू शकेल.
अननस
बऱ्याच मुलांना अननस खायला आवडतं. हे फळ चविष्ट तर असतंच पण पोटातील जंत नष्ट करण्यासाठीही गुणकारी ठरतं. अननसामध्ये असलेले डायजेस्टिव्ह एंजाइम्स हे जंतांची समस्या दूर करण्यास मदत करतात. मुलांना नियमितपणे सकाळी अंशपोटी अननसाचा ज्यूस प्यायला दिल्यास त्याचा फायदा दिसून येईल.
डाळिंब
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले डाळिंब हे आतड्यांतील जंत अथवा कृमीच्या समस्येवरही फायदेशीर आहेत. पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांवर डाळिंब खूप फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्या मुलाला वारंवार पोटात जंत होत असती ल व त्यामुळे त्रास होत असेल तर डाळिंबाची साल रात्रभर पाण्यात उकळून ठेवा. व ते पाणी मुलांना सकाळी रिकाम्या पोटी प्यायला द्या. तुम्ही मुलांना डाळिंबाचा रसही देऊ शकता.
तुळस
जर तुमचे मूल पोटातील जंतांच्या समस्येने त्रस्त असेल तर तुळशीची पाने यावर रामबाण उपाय ठरतील. तुळशीची पाने किंवा त्याच्या अर्कामुळे पोटातील जंत नष्ट होतात. तुळशीची पाने ही औषधी गुणधर्मांनी युक्त असतात. अशा परिस्थितीत मुलांना जंतांच्या समस्येपासून आराम देण्यासाठी तुळशीचा वापर केला जाऊ शकतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)