Hair Care Tips : दुभंगलेल्या केसांपासून सुटका हवी असेल तर वापरा ‘हे’ होममेड हेअर मास्क
आजकाल बऱ्याच लोकांन दुभंगलेल्या केसांच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे केस कमकुवत होतात आणि त्यांची वाढही खुंटते. त्यापासून सुटका हवी असल्यास घरी बनवलेल्या या हेअर मास्कचा वापर करून पाहा.
प्रत्येक व्यक्तीला छान, मजबूत आणि लांब केस हवे असतात. मात्र त्यासाठी वरवर काळजी घेऊन चालत नाही. केसांना नियमितपणे तेल लावणे, त्यांची नीट काळजी घेणे (Hair care) यासोबतच पोटातूनही केसांच्या वाढीसाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. स्प्लिट एंड्स किंवा दुभंगलेले केस (Split end hair problem) ही समस्या बरीच सामान्य आहे. आजकाल बऱ्याच लोकांना याचा सामना करावा लागोत. केस दुभंगल्यामुळे त्यांची वाढ खुंटते आणि ते खूप कमकुवतही होतात. असे केस फार पटकन तुटू शकतात. केस दुभंगण्याची अनेक कारणे असू शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब जीवनशैली, अपुरी झोप, वातावरणातील बदल, यासह केसांची नीट काळजी न घेणे, पुरेसे तेल न लावणे, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स, शांपूचा केसांवर अतिवापर या सर्व गोष्टी केस दुभंगण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे केस कमकुवत होतात. अशा वेळी केस थोडे ट्रीम करावे लागतात व त्यांची लांबी कमी होते. मात्र काही होममेड (घरगुती) मास्कनेही (Home made hair mask) दुभंगलेल्या केसांचे आरोग्य सुधारू शकते.
नारळ तेलाचा मास्क –
एका बाऊलमध्ये एक अंडे फोडून घालावे. त्यामध्ये एक चमचा मध आणि थोडे नारळाचे तेल (Coconut oil) घालावे. हे सर्व पदार्थ नीट मिसळावेत. आता हा हेअरमास्क टाळूवर आणि केसांच्या टोकांपर्यंत नीट लावावा. हा हेअर मास्क काही वेळ केसांवर तसाच ठेवावा. त्यानंतर एखाद्या सौम्य शांपूने केस स्वच्छ धुवावेत. या हेअरमास्कमुळे तुमच्या केसांना नीट पोषण मिळेल आणि ते दुभंगणार नाहीत. आठवड्यातून 1 ते 2 वेळा या हेअर मास्कचा वापर करावा.
अंडे व ऑलिव्ह ऑइलचा हेअर मास्क –
एका बाऊलमध्ये अंड्याचा फक्त पिवळा बलक घ्यावा. त्यामध्ये 2 ते 3 थेंब ऑलिव्ह ऑइल घालावे व त्यात थोडा मध मिसळावा. हे सर्व घटक एकत्र नीट मिसळावेत. केस थोडे ओले करून घ्यावे व त्यावर हा हेअर मास्क लावून ठेवावा. साधारणत: अर्ध्या तासाने केस शांपूने स्वच्छ धुवावेत.
पपईचा हेअर मास्क –
हा हेअर मास्क बनवण्यासाठी पपईचे तुकडे कापून ती पूर्णपणे मॅश करून घ्यावी. त्यामध्ये थोडेसे दही घालावे. हे दोन्ही पदार्थ नीट मिसळून मिश्रण घोटून घ्यावे. हा हेअर मास्क केसांवर व टाळूवर लावून ठेवावा. अर्ध्या ते पाऊण तासांनंतर केस कोमट पाण्याने व शांपूने स्वच्छ धुवावेत.
केळ्याचा हेअर मास्क –
केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वं असतात. त्यामध्ये पोटॅशिअम, झिंक ( जस्त), आयर्न ( लोह) आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. एक ते दोन पिकलेली केळी घ्या. ती मॅश करून तो हेअर मास्क केसांवर लावून ठेवावा. अर्ध्या तासानंतर पाण्याच्या सहाय्याने हेअर मास्क स्वच्छ धुवून टाका. त्यानंतर सौम्य शॅम्पू वापरून केस धुवा. यामुळे केसांना योग्य ते पोषण मिळते व त्यांची चांगली वाढ होते. दुभंगलेल्या केसांचे प्रमाणही कमी होते.
मधाचा हेअर मास्क –
एका बाऊलमध्ये थोडा मध घ्यावा. त्यामध्ये दही घालावे. दोन्ही पदार्थ नीट मिक्स करून मिश्रण एकजीव करावे. हा हेअर मास्क टाळूवर, केसांवर आणि केसांच्या मुळापर्यंत नीट चोळून लावावा. साधारणत: अर्ध्या तासाने शांपून केस धुवावेत. या हेअर मास्कमुळे केस मऊ आणि मुलायम बनतात. ते चमकदार बनतात. या हेअरमास्कच्या नियमित वापरामुळे केस कोरडे होण्याचे व ते गळण्याचे प्रमाणही कमी होते.