Kids Health: मुलांना गॅसेसचा त्रास होत असेल करून पहा ‘ हे ‘ 5 घरगुती उपाय !
तसं बघायला गेलं तर गॅसेस आणि अपचन होणं या समस्यांमुळे मोठ्या माणसांना त्रास होतो , पण बऱ्याच वेलेस लहान मुलांनाही गॅसेस होऊ शकतात.
मुंबईः लहान मुलांना (Small kids) गॅसेसची समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. खूप जास्त गॅस (gases) झाल्यामुळे मुलांचे पोट (stomach ache) दुखून ती रडायला लागू शकतात. मुलांच्या पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ वाटते आणि ती बेचैनही होतात. जर सतत गॅसेस होत असतील मुलं चिडचिडीही बनू शकतात. मुलांच्या पोटात गॅस होण्याची अनेक कारणे असू शकतात, उदा – फॉर्म्युला मिल्क जास्त प्रमाणात पिणे, दूध नीट न पचणे. बऱ्याच वेळा लहान मुलं बाटलीतील दुध पटापट पितात, ज्यामुळे त्यांच्या पोटात हवाही जाते, त्यामुळे गॅस होऊ (reasons) शकतात. एखादे मूल मोठे असल्यास, त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळेही त्यांना गॅसेसचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी मुलांना गॅसेसपासून मुक्ती मिळून आराम मिळावा यासाठी काही घरगुती उपायांची (Home Remedies) मदत घेता येऊ शकते. मात्र हे उपाय एका वर्षांवरील मुलांवर करावेत.
ओवा –
ओवा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. त्याच्या सेवनामुळे अन्न चण्यास मदत होते. मुलांना ओवा देण्यासाठी पाव कप पाणी उकळावे. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालावा. ते पाणी चांगले उकळू द्यावे. नंतर ओवा घातलेले पाणी गाळून घ्यावे व ते कोमट झाल्यानंतर मुलांना पिण्यास द्यावे. मुलांना ओव्याचा चहाही देता येऊ शकतो. मात्र मुलांना ओवा कमी प्रमाणात द्यावा.
वेलची –
वेलचीमध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात. त्यामध्ये लोह, फायबर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणात असते. मुलांना वेलची घातलेले दूध प्यायला देता येऊ शकते. किंवा त्यांच्या जेवणात 1-2 वेलची घालता येईल. वेलचीमुळे मुलांना होणारी उलटी, पचनाच्या समस्या दूर होऊ शकतात.
आल्याचे सेवन –
आलं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मुलांना आलं देताना, ते किसून घेऊन त्याचा रस काढून घ्यावा. त्या रसात थोडासा मध मिसळून मुलांना ते चाटण थोड्या-थोड्या प्रमाणात द्यावे. आल्यामुळे मुलांचे पचनतंत्र सुधारते. मात्र आलं थोड्याचं प्रमाणात द्यावं.
पोट शेकावे –
मुलांच्या पोटात गॅसमुळे वेदना होत असतील, तर त्यापासून आराम मिळावा म्हणून त्यांचे पोट शेकावे. कोमट पाण्यात एक टॉवेल भिजवून घ्या, घट्ट पिळून तो मुलांच्या पोटावर ठेवावा. असे केल्याने मुलांना गॅस व वेदनांपासून आराम मिळेल.
लिंबाचा रस व काळं मीठ –
मुलांना गॅस झाल्यास त्यांना काळं मीठ व लिंबाचा रस द्यावा. ते खूप खारट वाटल्यास त्यामध्ये थोडं पाणी मिसळता येऊ शकतं. या उपायांमुळे मुलांचे अन्नपचनही चांगले होईल. मात्र लिंबू रस व काळं मीठ थोड्या प्रमाणातच द्यावे.
मुलांना गॅसेसचा त्रास सतत होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता. मात्र मुलांना कोणताही पदार्थ देताना, कमी प्रमाणात खाण्यास द्यावा.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )