Constipation Home Remedies : महागडी औषधे नकोत, घरातल्या या गोष्टींनीच करा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर
अन्नामध्ये फायबरयुक्त गोष्टींचा अभाव, खराब जीवनशैली, शारीरिक श्रम न करणे आणि तणाव ही बद्धकोष्ठतेची सर्वात मोठी कारणे आहेत.
नवी दिल्ली : बद्धकोष्ठता (constpation) ही एक समस्या आहे ज्यामध्ये व्यक्तीला मलत्याग करण्यास खूप त्रास होतो. कधी-कधी दोन-तीन दिवसही शौचाला लागत नाही. त्यामुळे पोट नीट साफ ( stomach problems) होत नाही. अशा परिस्थितीत सतत चिडचिड राहतो, काही खावे-प्यावेसे वाटत नाही आणि कधी कधी पोटदुखीचा त्रासही होतो. या त्रासाकडे दुर्लक्ष करून ते हलक्यात घेण्याची चूक करू नका, कारण बद्धकोष्ठता अनेक समस्यांचे कारण असू शकते. बद्धकोष्ठतेचा त्रास हा कोणालाही, कोणत्याही वयात होऊ शकतो. कधी तो अवघ्या काही दिवसांसाठी असतो, पण कधी बद्धकोष्ठता दीर्घकाळ त्रास देऊ शकते. आहार आणि जीवनशैलीत काही आवश्यक बदल करून या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो.
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय कामाला येऊ शकतात.
– दररोज सकाळी उठल्यावर किमान दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्यानंतर चालण्याचा व्यायाम केल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
– रोज झोपण्यापूर्वी एक चमचा बडीशेप पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
– बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी दररोज सकाळी दोन ताजी सफरचंद न सोलता म्हणजेच सालासकट खावीत. किंवा एक ग्लास सोनेरी सफरचंदाचा ज्यूस प्यावा, ते फायदेशीर ठरते.
– रोज रात्री एक चमचा जवसाचे चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते.
– दररोज मूठभर मनुका पाण्यात भिजवून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
– बद्धकोष्ठता सतावत असेल तर दररोज एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घालून प्यावे. त्याने त्रास कमी होण्यास मदत होते.
– रोज रात्रीच्या जेवणात पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही.
– 10 ग्रॅम इसबगोल भुसा सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
– बीटरूट, सलगम, टोमॅटो, पालक, गाजर, मुळा व ताजा खोवलेला नारळ यांची कोशिंबीर खाल्ल्यास बद्धकोष्ठता दूर होते.
– रोज सकाळी रिकाम्या पोटी 8-10 मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही.
– बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काळे मीठ, भाजलेले जिरे आणि भाजलेला ओवा समान प्रमाणात मिसळून पावडर बनवा. हे अर्धा चमचा चूर्ण रोज रात्री कोमट पाण्यासोबत घ्या.
काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा
– दररोज ठराविक वेळी झोपण्याची, उठण्याची आणि जेवण्याची सवय लावा.
– अधिकाधिक फळे आणि भाज्या आणि फायबर युक्त गोष्टी खा.
– दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
– जास्त तेल-मसाले आणि मैद्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून लांब ठेवा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)