पिवळ्या दातांमुळे झालात हैराण ? हे उपाय करून पहा, दात मोत्यासारखे चमकतील
तुम्हीही पिवळ्या दातांमुळे त्रस्त झाला असाल तर काही सोप्या उपायांचा वापर करून पाह. तुमचे दात स्वच्छ होऊन चमकू लागतील.
नवी दिल्ली – पिवळे दात हे अस्वास्थ्यकर मौखिक आरोग्याचे (unhealthy oral health) लक्षण आहे, हा एक गैरसमज आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये हे खरं असलं तरी काही लोकांचे दात नैसर्गिकरित्या पांढरे (white teeth) असतात. पण खरं तर, काही संशोधन आणि अभ्यासातून मनोरंजक निष्कर्ष समोर आले आहेत. दातांवर काळे डाग असलेल्या व्यक्तींना दातांमध्ये कॅव्हिटीचा धोका कमी असतो. जसं आपलं वय वाढत तसं शरीरात काही बदल होऊ लागतात. वाढत्या वयासोबत केस पांढरे होणं, पातळ होणं, त्वचेवर सुरकुत्या पडणं हे बदल दिसतात, तसेच काही लोकांचे दातही पिवळे (yellow teeth) होऊ लागतात.
पण चांगल ओरल हायजिन (मौखिक स्वच्छता) असेल आणि दातांची नियमितपणे तपासणी करून घेतल्यास दात पांढरे राहतातच तसेच दातांचे आरोग्यही चांगले राखण्यास मदत होते. दातांचे डॉक्टर हे दात पांढरे ठेवण्यासाठी मदत करू शकतात. पण आजकाल दातांचा शुभ्रपणा आणि चमक परत आणणारी उत्पादने बाजारात सहज उपलब्ध आहेत, जी अगदी सहज घरी वापरता येतात.
तुम्ही धूम्रपान करत असाल, किंवा चहा-कॉफी वारंवार पीत असाल अथवा दातांची योग्य काळजी घेत नसाल तर साहजिकच तुमचे दात पिवळे पडतील. अशा वेळी बोलल्यावर किंवा हसल्यावर दाताचा पिवळेपणा दिसून येतो. तुम्हीही पिवळ्या दातांमुळे त्रस्त असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स नक्की करून पहा.
तज्ज्ञांचा सल्ला
दातांची परिस्थिती ही एका रात्रीत बिघडत नाही , त्यामुळेच त्याचा कायापालटही एका दिवसात होणारा नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले. ते लगेच मोत्यासारखे पांढरे किंवा चमकदारही होऊ शकत नाहीत. पण दातांचा पिवळा थर हळूहळू कमी करणे शक्य आहे, परंतु यासाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे अनिवार्य आहे, असेही डॉक्टर सांगतात.
दररोज ब्रश करा
एखादे पेय किंवा अन्नपदार्थ कपड्यांवर पडल्यास त्यांना डाग लागतात, तसेच दातांचेही आहे. आपण काही खाल्यावर दातांवरही डाग पडतात. दातांचा कठोरपणा किंवा दीर्घायुष्य, हे आपण काय खातो यावर अवलंबून असते. यामुळेच दररोज, नियमितपणे ब्रश करणे हे गरजेचे आहे. हे खूप महत्वाचे आहे, पण काही लोक मूलभूत गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. दररोज किमान दोन मिनिटे स्वच्छ दात घासले पाहिजेत. सर्व कोपऱ्यातून दात स्वच्छ करावेत. एखादा पदार्थ खाल्ला किंवा काही प्यायले तरीही दात स्वच्छ करा, खळखळून चूळ भरा. मात्र हे प्रमाणात करावे. जास्त ब्रश केल्याने दातांच्या एनामलचे नुकसान होऊ शकते.
धूम्रपान करू नका
धूम्रपान करणार्यांच्या किंवा तंबाखू चघळणार्या लोकांचा दातांचा रंग खराब होतो. त्यामुळे दातांवर डाग नको असतील तर तंबाखू बंद करणे अत्यंत आवश्यक आहे.
काही पदार्थ आणि पेये टाळावेत
कॉफी, चहा, शीतपेये, अल्कोहोलयुक्त पेये, वाइन, सोया आणि टोमॅटो सॉस किंवा लिंबूवर्गीय आहार यासारखे काही खाद्यपदार्थ किंवा पेय यामुळे दात जास्त पिवळे होतात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करा अथवा ते खाणे-पिणे बंद करा. जर पिवळे दात असलेले कोणीतरी या गोष्टी नियमितपणे किंवा दररोज सेवन करत असेल, तर पहिली पायरी म्हणजे त्यांचे सेवन कमी करणे किंवा ते पूर्णपणे टाळणे.
होम केअर रूटीनसह दातांची स्वच्छताही तितकीच आवश्यक आहे. ज्या लोकांना स्वच्छ दात हवे आहेत ते दात पांढरे करणारी टूथपेस्ट वापरू शकतात. पण काही पदार्थ दातांसाठी वापरणे टाळावे.
दातांवरील डाग काढण्यासाठी दातांच्या एनामलच्या (पृष्ठभागावर) लिंबू लावणे टाळा. लिंबू हे आम्लधर्मी असते, त्यामुळे दात संवेदनशील होऊ शकतात. त्यांचे नुकसान होऊ शकते.