आनंदाची बातमी! आता जिवघेण्या ‘कॅन्सर’वरही मिळणार लस… पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा पुढाकार; कर्करोगाचा होईल नायनाट!
गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर भारताची स्वतःची स्वदेशी लस येणार आहे. ड्रग्ज रेग्युलेटरने ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस तयार करण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. या लसीचे नाव CERVAVAC असेल. जाणून घ्या, कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीच्या संदर्भातील माहिती.
आता देशात गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर (Cervical cancer) पहिली स्वदेशी लस मिळणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)ला गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लस (Vaccine against cancer) तयार करण्याची परवानगी दिली आहे. या लसीचे नाव CERVAVAC असे ठेवण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध क्वाड्रिव्हॅलंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लस साठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली होती. या लसीच्या फेज-2 आणि फेज-3च्या यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. चाचणीमध्ये ही लस सर्व वयोगटातील महिलांवर प्रभावी ठरली असल्याचा दावा केला जात आहे. या लसीचा सर्व प्रकारच्या एचपीव्ही विषाणूवर परिणाम दिसून आला आहे. एचपीव्ही लसीमुळे स्त्रियांमध्ये आढळून येणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण 90% पर्यंत कमी होऊ शकते असा दावा करण्यात येत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमधील दुसरा प्रमुख कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे काय?
असे मानले जाते, की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांमध्ये होतो, परंतु काहीवेळा तो पुरुषांनाही होऊ शकतो. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाच्या बाबतीत, जननेंद्रियाचा संसर्ग होतो. वेळीच काळजी घेतली तर त्यावर उपचार करता येतात, पण उशीर झाल्यास किंवा संसर्ग पसरल्यास मृत्यू होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, गर्भाशय मुखाचा कर्करोग हा जगातील महिलांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2020मध्ये, जगभरात 6 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आणि 3.42 लाख मृत्यू झाले. 2020मध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपैकी 90% प्रकरणे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आली आहेत.
एचपीव्हीची लागण
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)मुळे होतो. एचपीव्ही हे गर्भाशयाच्या मुखाच्या 95%पेक्षा जास्त कर्करोगाचे कारण आहे. एचपीव्ही सहसा लैंगिक संभोगाद्वारे पसरतो. लैंगिक संबंधादरम्यान अनेक लोक याला पसरवितात. डब्ल्यूएचओच्या मते,ज्या स्त्रिया आणि पुरूष अधिक लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी एचपीव्हीची लागण होऊ शकते. अनेक वेळा काही लोकांना संसर्ग होतो. तथापि, 90 टक्के प्रकरणांमध्ये हे संक्रमण त्याचे त्याचेही संपू शकते.
डब्ल्यूएचओच्या मते…
निरोगी स्त्रीला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 वर्षे लागतात. जर एखाद्या महिलेची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल किंवा एचआयव्हीचा उपचार केला गेला नाही तर तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यासाठी 5 ते 10 वर्षे लागतात. डब्ल्यूएचओच्या मते, एचआयव्ही ग्रस्त महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता 6 पट जास्त असते.
भारतात काय परिस्थिती आहे?
- – भारतात 44 कोटींहून अधिक महिला आहेत. 15 ते 64 वयोगटातील महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका सर्वात जास्त असतो.
- – नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार, भारतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.
- – 2015मध्ये, देशात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची 65,978 प्रकरणे नोंदवली गेली आणि 29,029 मृत्यू झाले. त्याच वेळी, 2020मध्ये 75,209 प्रकरणे नोंदवली गेली आणि 33,095 मृत्यू झाले.
- – 2020मध्ये, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे उत्तर प्रदेशात 4420, महाराष्ट्रात 2952, पश्चिम बंगालमध्ये 2499, बिहारमध्ये 2232 आणि कर्नाटकात 1996 मृत्यू झाले.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आणि उपचार
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यास अनेक वर्षे लागतात. त्यामुळे त्याची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. जेव्हा गर्भाशय मुखाचा कर्करोग असतो तेव्हा सामान्यतः गुप्तांगातून रक्तस्राव जास्त होतो. योनीमार्गात इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन, सेक्स केल्यानंतर रक्त येणे, योनीतून स्त्राव होणे, वजन कमी होणे, पायांना सूज येणे अशी लक्षणे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगात दिसून येतात.
सुरुवातीलाच ओळखला गेला तर…
हा आजार सुरुवातीलाच ओळखला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. भारतात एक लस आहे, परंतु सध्या ती फक्त 9 ते 26 वयोगटातील मुलींसाठी आहे. सीरम इन्स्टिट्यूटची स्वदेशी लस आल्यावर भारतातील कॅन्सरग्रस्त महिलांना दिलासा मिळेल आणि देशातील चित्र पालटेल, अशी अपेक्षा आहे. याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारित केले आहे.