विक्रम गोखले यांना ठेवण्यात आलेली लाईफ सपोर्ट सिस्टम म्हणजे काय? त्यामुळे जीव वाचण्याची शक्यता किती?
रुग्णाच्या शरीरावर त्याचे नियंत्रण येईपर्यंत त्याला जिवंत ठेवण्याचे काम लाईफ सपोर्ट सिस्टिमद्वारे केले जाते. लाइफ सपोर्ट म्हणजे मृत्यू नाही.
मुंबईः अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. ते पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar hospital) रुग्णालयात उपचार उपचार घेत आहेत. अशातच बुधवारपासून त्यांच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या. मात्र विक्रम गोखले यांच्या मुलीने माध्यमांना स्पष्टीकरण दिले. विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर (Life Support System) ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयीचे हेल्थ बुलेटिन लवकरच जारी करण्यात येईल.
ज्या रुग्णांचे अवयव शरीरातील यंत्रणेला साथ देणे बंद करतात, त्यांना इतर सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर डॉक्टर लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्याचा निर्णय घेतात.
अभिनेते विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, बुधवारी दुपारी विक्रम गोखले कोमात गेले. तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयीचा पुढचा निर्णय डॉक्टर घेतील.
विक्रम गोखले 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र सध्या ती पुन्हा चिंताजनक झाली आहे. हृदय आणि किडनीसंबंधी समस्या त्यांना जाणवत आहे. तसेच त्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी झाले असल्याची माहिती बुधवारी डॉक्टरांनी दिली.
एखाद्या रुग्णाच्या शरीरातील बहुतांश अवयम काम करत नाहीत, तेव्हा लाइफ सपोर्ट सिस्टिमद्वारे माणसाला जिवंत ठेवता येऊ शकते. जे अवयव निकामी झाले आहेत, त्यांचे कार्य या सिस्टिमद्वारे पार पाडले जाते.
लाइफ सपोर्ट सिस्टिममध्ये यांत्रिक श्वासोच्छ्वास, सीपीआर, ट्यूब फीडिंग, डायलेसिस आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. फक्त या यंत्रणेचा आधार घेणं, नाकारणं किंवा थांबवणं, हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असतो.
रुग्णाच्या शरीरावर त्याचे नियंत्रण येईपर्यंत त्याला जिवंत ठेवण्याचे काम लाईफ सपोर्ट सिस्टिमद्वारे केले जाते. लाइफ सपोर्ट म्हणजे मृत्यू नाही. पण या यंत्रणेचा आधार दिल्यानंतर काही वेळा आपले शरीर परत स्वनियंत्रण मिळवण्याची क्षमता गमावून बसते.
लाइफ सपोर्ट सिस्टिमचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे आपल्या रुग्णाच्या प्रकृतीविषयी योग्य ती माहिती मिळवल्यानंतरच तिचा आधार घ्यायचा की नाही, हे रुग्णांचे नातेवाईक ठरवत असतात.
न्युमोनिया, ड्रग ओव्हरडोस, ब्लड क्लॉट, सीओपीडी, सिस्टिक फायब्रोसिस, फुप्फुसात जखम किंवा नर्व्ह डिसीजमुळे फुप्फुसात संसर्ग झाल्यास, अचानक कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक आल्यास किंवा ब्रेन स्टोक झाल्यास लाइफ सपोर्ट सिस्टिम दिली जाते.
रुग्णाच्या शरीरातील बंद पडलेल्या अवयवांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली तर काही काळानंतर लाइफ सपोर्ट सिस्टिम काढून पुन्हा एकदा शरीराला स्वनियंत्रणाद्वारे चालवले जाऊ शकते. प्रत्येक रुग्णाच्या आजारांवर हे अवलंबून असते. सध्या विक्रम गोखले यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांकडून सुरु आहेत.