मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : रोज चालायला जाण्याने तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा होत असते. रोज चालल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. सुरुवातीला असे म्हटले जायचे की रोज दहा हजार पावले चालणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर पळतात असे म्हटले जायचे. आता नव्या संशोधनात म्हटले आहे की आपण जर रोज एक ते दीड किमी चाललो तरी अनेक आजारापासून सुटका करुन घेऊ शकतो. यासाठी केवळ 15 ते 20 मिनिटे चालणे पुरेसे आहे. त्याकरीता तुम्हाला रोज केवळ 4 हजार पावले रोज चालावे लागेल. एका अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहेत.
या अभ्यासात 2,26,889 लोकांच्या दिनचर्येचा अभ्यास केला गेला. रोज चार हजार पावले चालल्याने तुमचे हृदयासंबंधीचे आजार कमी होतील. युरोपीय जर्नल ऑफ प्रिव्हेंटिंग कार्डीओलॉजीमध्ये प्रकाशित अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहे. जेवढे आपण रोज चालता त्यात एक हजार पावलांची भर केली तर हृदयासंबंधी होणाऱ्या मृत्यूची शक्यता सात टक्क्यांनी कमी होते. तुम्ही रोज आपल्या चालण्यात सातत्य राखाल त्याचा फायदा दुप्पट होईल. पायी चालण्यासंबंधी अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. परंतू हा पहिलाच असा अभ्यास आहे ज्यात हे सांगितले आहे की किती पावले चालण्याने किती आजार कमी होतील. पायी चालणे एका औषधासारखे कामी येते असे अभ्यासात म्हटले आहे.
अभ्यासात असे म्हटले आहे की चार हजार पावले चालण्याने ब्लडप्रेशरमध्ये पाच एचजी कमी होते. म्हणजे वरचा आणि खालचा दोन्ही ब्लडप्रेशर कमी होतात. तसेच तीन महिन्याची सरासरी ब्लड शुगर म्हणजेच एचबीए 1 एसी खूपच कमी येते. चार हजार पावले रोज चालण्याने तुमचे वय कमी दिसते. चार हजार पावले चालण्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. जसे कॅन्सर, हार्ट अटॅक आदीचा धोका कमी होतो. जी टीनेजर मुले रोज सात ते तेरा हजार पावले चालतात, त्यांच्या आरोग्यात अनेक सुधारणा पाहायला मिळाल्या. त्यांच्या नंतरच्या जीवनात त्यांना कोणतीच क्रोनिक आजार झालेले आढळले नाहीत.