नवी दिल्ली – थंडीच्या दिवसात (winter) गरमागरम चहा पिणे आणि उबदार पांघरुणात गुरफटून झोपणे, या दोन गोष्टींची मजा काही औरच असते. जसजशी तापमानात घट होते, आपणा सर्वांनाच घरी जाउन झोपायची (to sleep) इच्छा होते. हिवाळ्याच्या दिवसात ऊनही कमी असते, त्यामुळे बऱ्याच लोकांना बाहेर फिरण्यापेक्षा घरात उबदार (warm room) वातावरणात बसायला आवडतं. हे फक्त आपल्या बाबतीत नाही तर बरेच लोक थंडीत आळशी होतात आणि त्यांना खूप झोपही येते. मात्र हे असं का होतं माहीत आहे का ?
थंडीत जास्त झोप का येते ?
सर्कॅडियन स्लीप सायकल हे आपल्या शरीराचे प्रोग्रामिंग आहे, ज्यामुळे आपल्याला कधी झोपावे आणि केव्हा जागे व्हावे हे समजते. जेव्हा सूर्यप्रकाश नसतो, अंधार पडतो तेव्हा माणसं सहसा झोपतात आणि सकाळी उजेड झाल्यावर जागे होऊन ॲक्टिव्ह होतात. अंधारामुळे मेलाटोनिन हे स्लीप हार्मोन तयार होते, ज्यामुळे आपली झोप नियंत्रित होते. तर उजेडामुळे अथवा प्रकाशामुळे ही प्रक्रिया मंदावते. थंडीच्या काळात दिवस लहान असल्याने सेरोटोनिन हार्मोनचा स्तर कमी होतो ज्यामुळे चिंता आणि नैराश्य वाढते. यामुळे आपले शरीर संथ होते.
मेलाटोनिन आपल्या डोळ्यांतील फोटोरिसेप्टर पेशींनुसार कार्य करते. प्रकाश कमी होत आहे हे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचताच मेलाटोनिनची पातळी वाढते आणि आपल्याला झोप येऊ लागते.
थंडीत आळस कसा कमी करावा ?
आपण आपल्या मनावर अनेक प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो. त्याच्या मदतीने, हिवाळ्यातील आळशीपणा देखील टाळू शकतो.
– दिवसा खोलीत प्रकाश येऊ द्या, खिडक्या आणि दारांचे पडदे उघडे ठेवावेत.
– कितीही थंडी असली तरी अंथरुणावर बसून जेऊ नका, नेहमी खुर्चीवर बसून जेवा.
– ऑफीसमध्ये काम करताना दर अर्ध्या-एका तासाने 5 ते 10 मिनिटे चालावे.
– सुट्टीच्या दिवशीही फक्त 8 तासांची झोप घ्यावी, झोपेचे चक्र बिघडवू नका.
– हलका आहार घ्या. प्रक्रिया केलेले, गोड आणि तळलेले अन्न खाणे टाळा.
– सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर पडा आणि व्यायाम करा.
– थंडीत तहान कमी लागते, त्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने सतत पाणी पित रहावे.
– सकस आहार घ्या. ऋतूनुसार मिळणारी फळे आणि भाज्या खा.
– थंडी आहे म्हणून घरात बसू नका. मित्र आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेर पडा.
– व्हिटॅमिन-डी मिळविण्यासाठी दररोज थोडा वेळ तरी उन्हात बसा.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)