दिवसभर आराम करूनही का जाणवतो थकवा? चिंतेचा विषय बनू शकतो
तुम्हाला दिवसभर आराम करूनही शरिर थकल्यासारखंच जाणवतं का? किंवा ऊर्जा कमी झाल्यासारखं जाणवतं का? तर हा पुढे जाऊन चिंतेचा विषय बनू शकतो कसं ते पाहुयात .
आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा येणे सामान्य बाब आहे. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिवसभर आराम करूनही थकवा जाणवत असेल तर, तो चिंतेचा विषय नक्कीच बनू शकतो. कारण हा केवळ थकवा नाही तर काही गंभीर समस्येचे लक्षणही असू शकतं.
थकवा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जी शारीरिक आणि मानसिक दोन्ही असू शकतात. पण सतत थकवा जाणवणे हे पुढे चिंतेचा विषय बनू शकतो. थकवा येण्याची कारणे कोणती आणि त्यावर मात करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय असू शकतात? ते पाहुया.
शारीरिक थकवा येण्याची कारणे
शारीरिक थकवा येण्याच्या मुख्य कारणांमध्ये झोपेची कमतरता, पौष्टिकतेची कमतरता किंवा काही आजार यांचा समावेश असू शकतो. हायपोथायरॉईडीझम, ॲनिमिया आणि मधुमेह यांसारख्या समस्यांमुळेही थकवा वाढू शकतो. याशिवाय शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यामुळेही एनर्जी लेव्हल घसरते.
मानसिक कारणांमुळे थकवा येणे
मानसिक थकवा यामागे तणाव, चिंता आणि नैराश्य यांसारखी कारण असू शकतात. कामाचा ताण आणि मानसिक दबाव देखील तुमचा मानसिक थकवा वाढवू शकतो.
थकवा टाळण्यासाठी उपाय
थकवा दूर करण्यासाठी संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. तर तणावामुळे येणारा थकवा टाळण्यासाठी योगा आणि ध्यान करणे देखील फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान थकवा टाळण्यासाठी तुम्ही अगदी प्रमाणात चहा, कॉफीसुद्धा घेऊ शकता. पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी त्याचे नुकसान जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो ते प्रमाणातच घेणे चांगले आहे.
डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम
थकवा कायम राहत अल्यास किंवा एनर्जी सारखीच कमी वाटत असल्यास स्वत:च्या मनाने औषधे घेणे किंवा झोपेच्या गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विसरू नका. कारण सतत थकवा येणे तुमच्या दिनचर्येवर परिणाम करेल. जर हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असेल तर ते कदाचित वैद्यकिय तपासणीदरम्यान समोर आल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येणं शक्य आहे.