World Oral Health Day 2023 : तुमच्याही तोंडाला येतो का सतत वास ? ‘या’ 5 कारणांमुळे तोंडातून येऊ शकतो दुर्गंध
बऱ्याच लोकांच्या तोंडातून दुर्गंध येत असतो, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. 'वर्ल्ड ओरल हेल्थ डे' निमित्ताने तोंडाचे आरोग्य चांगले राखण्याचे उपाय जाणून घेऊया.
नवी दिल्ली : दरवर्षी 20 मार्च रोजी ‘ वर्ल्ड ओरल हेल्थ डे ‘ (World Oral Health Day 2023 ) साजरा केला जातो. मौखिक अथवा तोंडाच्या आरोग्याच्या समस्येबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. दात, जीभ किंवा तोंडाच्या इतर भागांमधील समस्यांबद्दल (oral problems) लोकांनी गंभीर असले पाहिजे. कधी-कधी या छोट्या-छोट्या समस्याही मोठ्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतात. तोंडातून दुर्गंधी अथवा वास येणे हे (bad breath) तोंडाचे आरोग्य चांगले नसण्याचे अथवा आजारी असण्याचे एक लक्षण असू शकते. कधीकधी हा रोग गंभीर हीअसू शकतो. ‘ वर्ल्ड ओरल हेल्थ डे ‘ निमित्त तोंडाला दुर्गंध येण्याची कारणे कोणती व त्यावर काय उपाय करता येऊ शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
तोंडाला वास अथवा दुर्गंध येण्याची कारणे
अनेक वेळा असं होतं की काही लोकं दिवसातून दोनदा ब्रश करतात, दात स्वच्छ घासतात, तरीही त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येते. अशा वेळी इतरांशी संवाद साधताना लाज वाटते आणि आत्मविश्वासही कमी होतो. पण कधीकधी केवळ दात घासणं पुरेसं नसतं. कधीकधी तोंडातून दुर्गंधी येण्याचे कारणकाहीतरी वेगळे असू शकते. म्हणूनच प्रथम ती कारणे समजून घेणे व त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
लसूण अथवा कांद्याचे सेवन करणे
लसूण आणि कांद्याचा वास खूप उग्र असतो. एखादी व्यक्ती दूर उभी असेल आणि तिने कांदा-लसूण खाल्ले असेल तर तेही लगेच ओळखता येते. खरंतर लसूण आणि कांद्यामध्ये असे घटक असतात, जे खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते, जी ब्रश करूनही जात नाही.जर तुम्ही नियमित कांदा, लसूण खात असाल तर तुमच्या श्वासाला खूप दुर्गंध येऊ शकतो.
मद्यपान अथवा धूम्रपान करणे
दारू पिणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते. दारूचा वास लांबूनही येतो. त्याचप्रमाणे धूम्रपान करणाऱ्यांनाही दुरूनच ओळखले जाते. त्यांच्या ओठांचा रंग काळवंडलेला असतो तसेच दातांवरही परिणाम होतो. त्यामुळे तोंडाचा वास घालवायचा असेल आणि मुळात चांगले आरोग्य हवे असेल तर मद्यपान व धूम्रपान या दोन्ही वाईट सवयी वेळीच सोडाव्यात.
तोंड कोरडे पडणे
सर्वसाधारणपणे, सर्व लोकांच्या तोंडात लाळ तयार होते. लाळ तोंडातील बॅक्टेरिया साफ करण्यास मदत करते. पण ज्या लोकांच्या तोंडात योग्य लाळ तयार होत नाही वा ज्यांचे तोंड खूप कोरडे पडते, अशा लोकांच्या तोंडाला दुर्गंध येऊ शकतो.
औषधांचा परिणाम असू शकतो
तोंडात, नाकात किंवा घशातील काही आजार, अथवा एखादे औषध घेतल्याने त्याची रिॲक्शन येऊन अथवा दोन्ही कारणांमुळे तोंडातून दुर्गंध येऊ शकतो.
पोट खराब असू शकते
कधीकधी पोटदुखी आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग याव्यतिरिक्त इतर आरोग्य कारणांमुळे श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. तोंडातून जास्त वास येत असेल तर डॉक्टरांना दाखवावे.
दातातील कीड
तोंडातून दुर्गंध येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे दातांमधील कीड. जेवहा दोन दातांदरम्यान पोकळी निर्माण होते तेव्हा काहीवेळा दातांमध्ये क्रॅक होतात. अशा वेळेस खाल्लेल्या अन्नाचे बारीक कण बर्याचदा त्या पोकळीत अडकतात, जे सहसा ब्रश केल्याने दूर होत नाही. अन्नाचे असे कण जास्त वेळ अडकून राहिल्यास दात किडतात तसेच तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. जर तुमच्या दाताला कीड लागली असेल किंवा दातांमध्ये फट अथवा पोकळी असेल तर वेळोवेळी दात स्वच्छ करत राहा.
अशी मिळवा तोंडाच्या दुर्गंधापासून मुक्तता
– दररोज दोनदा दात घासण्याव्यतिरिक्त, नियमितपणे आपल्या डेंटिस्टला भेट द्या आणि आपले दात स्वच्छ करा.
– दातांसोबतच जीभही स्वच्छ करत राहा.
– आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा.
– खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरा. दात नीट व नियमितपणे स्वच्छ करा. डेंटल फ्लॉसिंग देखील तितकेच महत्वाचे आहे.