World Senior Citizens’ Day 2023 : वाढत्या वयात होऊ शकतात अनेक मानसिक आजार, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
घरात मोठी, वडीलधारी माणसं असणं नेहमीचं चांगलं असतं. त्यांच्या आशीर्वादाने, अनुभवाने जीवनात चांगलं मार्गदर्शन मिळतं. पण वाढत्या वयासह जीवनात अनेक बदल होतात. या वयात बऱ्याचवेळेस लोकांना मानसिक समस्याही भेडसावू लागतात.
नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : माणूस तरूण असो वृद्ध जीवनात, कोणत्याही काळी मानसिक आजाराचा सामना करावा लागू शकतो. पण, लोक जसजसे मोठे होतात, तसतसे ते या मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. गोष्टी विसरणे किंवा कधीकधी दुःखी होणे हा वृद्धत्वाचा नैसर्गिक भाग आहे, असे मानतात. पण हे नेहमीच खरे नसते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या आकडेवारीनुसार, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे 15 टक्के लोकांमध्ये काही प्रकारचे मानसिक विकार आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, वृद्ध लोकसंख्येपैकी सुमारे 3.8 टक्के लोक अँक्झायटी डिसऑर्डरने प्रभावित आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन (World Senior Citizens’ Day ) साजरा केला जातो.
वृद्धांमधील मानसिक आजाराच्या काही लक्षणांबद्दल जाणून घेऊया-
लोकांपासून दूर राहणे
जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती अचानक लोकांपासून दूर जाऊ लागली, संवाद कमी केला किंवा संवाद साधण्यात अडचण येऊ लागली तर ते मानसिक आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते.
चिडचिड
आपले भावनिक वर्तन अनेकदा सामाजिक संबंधांवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, वाढत्या वयाबरोबर, एखादी व्यक्ती सामाजिक परिस्थिती टाळू लागली, त्यांना लगेच अस्वस्थ वाटत असेल, चिडचिड होत असेल तर हे त्यांच्या मानसिक आजाराचे लक्षण आहे.
स्वत:ची काळजी न घेणे
स्वत:ची काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे आणि वय वाढल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत, जर लोक त्यांच्या वैयक्तिक ग्रूमिंगकडे, स्वच्छता आणि स्वत:कडे दुर्लक्ष करू लागले, तर ते त्यांना काही समस्या असल्याचे लक्षण आहे.
वजनात बदल होणे
भूकेच्या पॅटर्नमध्ये बदल होणे, सतत खराब मूड, एकटेपणा, दु:ख यापैकी कोणत्याही कारणांमुळे वजन अचानक कमी होऊ शकते. आसपासचे ज्येष्ठ नागरिक मानसिक समस्येशी लढा देत असल्याचे हे लक्षण आहे.
झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल
जर एखाद्या व्यक्तीला वृद्धापकाळात झोपेचा त्रास होत असेल तर हे देखील मानसिक विकाराचे लक्षण असू शकते. तर काही केसेसमध्ये वृद्ध व्यक्तींना जास्त झोपही लागू शकते.
विस्मरण
वृद्धापकाळात अनेकदा विसरण्याची समस्या उद्भवते. तथापि, जर व्यक्तीला नावे लक्षात ठेवण्यात अडचण येत असेल, स्मृतिभ्रंश होत असेल किंवा बोलण्यास त्रास होत असेल अथवा नुकतेच झालेले संभाषण लक्षात ठेवण्यास अडचण येत असेल तर ही सर्व मानसिक आजाराची लक्षणे आहेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)