World Suicide Prevention Day : टीनएजर्सना आत्महत्येपासून रोखण्यासाठी पालकांनी फॉलो कराव्यात ‘या’ टिप्स
दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे' (जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन) साजरा केला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करणे, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
संपूर्ण जगभरात आत्महत्या ही (Suicide) एक मोठी समस्या बनली आहे. वृद्ध नागरिकांमध्ये आत्महत्येचा धोका अधिक असतो, असे मानले जात होते. मात्र आता तरूण आणि किशोरवयीन मुलेही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. अलीकडेच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) भारतात 2020 या वर्षात झालेल्या आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात 18 वर्षांखालील 11 हजारांहून अधिक किशोरवयीन मुलांनी मृत्यूला कवटाळल्याचे यामध्ये आढळून आले. त्यापैकी 5392 मुले तर 6004 मुली होत्या. ‘वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे’च्या (जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन) (World Suicide Prevention Day) निमित्ताने आम्ही हे सांगत आहोत, की आई-वडील काय काळजी घेऊन किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यापासून रोखू शकतात.
किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे कारण काय?
मायो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार, बहुतांश टीनएजर्स किंवा किशोरवयीन मुले ही मानसिक अवस्थतेमुळे आत्महत्येसारखे गंभीर टोकाचे पाऊल उचलतात. त्यामध्ये अत्याधिक तणाव, नकार मिळणे, अपयश मिळण, ब्रेकअप होणे, शाळेतील त्रास, कुटुंबातील समस्या, करिअरची चिंता, मेंटल डिसऑर्डर यासारख्या अनेक कारणांचा समावेश असू शकतो. याशिवाय इतरही अनेक कारणे किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. ज्या किशोरवयीन मुलांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, ते परत अशी कृती करण्याचा धोका असतो. पालकांनी अशा प्रकरणात विशेष काळजी घेतली पाहिजे.
‘ही’ लक्षणे दिसल्यास व्हा सावध –
- आत्महत्येबद्दल लिहिणे किंवा त्याबद्दल बोलणे
- सोशल लाइफपासून खूप दूर राहणे
- खूप मूड स्विंग्समुळे त्रस्त होणे
- मद्यपान अथवा अमली पदार्थांचे सेवन करणे
- निराश व असहाय्य वाटणे
- खाण्या-पिण्याचे तसेच झोपण्याचे पॅटर्न बदलणे
- स्वत:ला त्रास अथवा जखम करण्यासारखी कृती करणे
- अधिक ताण, नैराश्य वाटणे
- स्वभावात खूप जास्त बदल होणे
- अचानक मित्र बदलणे
किशोरवयीन मुलांना आत्महत्येपासून रोखण्याचे उपाय –
मानसिक आरोग्याबद्दल बोलावे –
पालकांनी त्यांच्या मुलांशी मेंटल हेल्थ म्हणजेच मानसिक आरोग्याबद्दल बोलले पाहिजे. जर मुलं मानसिकरित्या त्रस्त किंवा दु:खी असतील किंवा नैराश्याशी लढा देत असतील तर पालकांनी त्यांची मदत केली पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे. मेंटल डिसऑर्डरपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांना दाखवावे. तज्ज्ञांना भेटून, त्यांच्याशी बोलून या विषयावरील टिप्स घेता येऊ शकतात.
मुलांना एकटं सोडू नका –
मुलांमध्ये आत्महत्येची कोणतीही लक्षणं दिसत असतील तर पालकांनी त्यांच्याकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय मुलांना एकटं राहण्यापासून रोखावे आणि सतत त्यांच्या आसपास राहावे. त्यांच्याजवळ अथवा आसपास अशा कोणत्याही गोष्टी ठेऊ नयेत, ज्यामुळे ते स्वत:ला नुकसान करून घेऊ शकतात.
सोशल मीडियावर ठेवा लक्ष –
किशोरवयीन मुलांसाठी सोशल मीडिया तणावाचे प्रमुख कारण बनत आहे. अनेक जण सोशल मीडियावर आपल्याला न बोलता आलेल्या भावना व्यक्त करतात, त्यावर पालकांनी लक्ष ठेवायला हवं. सोशल मीडियावर कोणी मुलांना त्रास देत असेल किंवा दादागिरी करत असेल तर पालकांनी त्याबद्दल मुलांशी बोललं पाहिजे. सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून टीनएजर्सच्या अॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवता येतं. सोशल मीडियाची समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढायला हवा.
निरोगी जीवनशैलीसाठी मुलांना प्रोत्साहित करा –
किशोरवयीन मुलांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित केले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे. योग्य वेळी झोपणे, खाणे-पिणे आणि व्यायाम केल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या दूर होतात. या चांगल्या सवयी त्यांना आत्महत्येसारखे विचार दूर ठेवण्यास मदत करतील. पालकांनी टीनएजर्सच्या आनंदाची काळजी घ्यावी.