Photos : मानवी इतिहासाची दिशा बदलणारे जगातील 10 आंदोलनं कोणती? वाचा सविस्तर…
जगातील कोणताही मोठा बदल हा संघर्ष केल्याशिवाय किंवा आंदोलन केल्याशिवाय होत नाही याला इतिहास साक्षीदार आहे.
नवी दिल्ली : जगातील कोणताही मोठा बदल हा संघर्ष केल्याशिवाय किंवा आंदोलन केल्याशिवाय होत नाही याला इतिहास साक्षीदार आहे. लांब कशाला पहायचं, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचंच उदाहरण पाहा ना. 1857 रोजी पहिल्यांदा ब्रिटीश सरकारविरोधात देशभरात असंतोषाची ठिणगी पडली आणि त्यानंतर तब्बल 90 वर्षांनी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य आंदोलनामुळेच आपण आज स्वतंत्र देशात जगत आहोत. याशिवाय मतदानाचा अधिकार कुणाला द्यायचा येथून तर अगदी कैद्यांच्या मानवाधिकारांपर्यंत अनेक आंदोलनं आहेत ज्यामुळे मानवी इतिहासाला नवी दिशा मिळाली आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्का बहाल झाला. यापैकीच मोजक्या 10 आंदोलनांचा हा आढावा (10 most important movements protest of Human history which changed the world).
1. भारतीय स्वातंत्र्य लढा
आपण एकेकाळी गुलाम होतो आणि ब्रिटिश सांगतील तसंच आपल्याला करावं लागत होतं. यानंतर या अन्यायाविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हजारो लोकांनी आपलं रक्त सांडलं, इंग्रजांशी शत्रुत्व पत्करलं, ब्रिटिश सरकारला वारंवार प्रश्न विचारत सळो की पळो केले, तुरुंगात गेले, पोलिसांच्या लाठ्या काठ्या झेलल्या. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे आंदोलनच झालं नसतं तर आज आपण जो समृद्ध भारत पाहात आहोत तो कधीही दिसला नसता.
2. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन
मानवी इतिहासात महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून करण्यात आलेलं आंदोलन सर्वाधिक काळ चाललेलं आंदोलन आहे. तब्बल 110 वर्षे महिलांच्या मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष सुरु होता. त्यानंतर महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. जगात सर्वात पहिल्यांदा न्यूझीलंड देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. जगभरातील या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरच भारतातही महिलांना मतदानाचा अधिकार देण्यास परंपरावाद्यांकडून विरोध झालेला असतानाही स्वातंत्र्य आंदोलनातील आधुनिक विचाराच्या नेत्यांनी समतेच्या मुल्याला प्राधान्य देत कोणताही भेदभाव न करता महिलांनाही मतदानाचा अधिकार दिला.
3. अमेरिकेतील मानवाधिकार आंदोलन
अमेरिकेत वर्णद्वेषातून काळ्या रंगाच्या नागरिकांसोबत जो भेदभाव होत होता त्याविरोधात देखील मोठं आंदोलन झालं. तेही अनेक दशकं चाललं. विशेष म्हणजे अमेरिकेत कायद्यांमध्येच रंगावरुन भेदभाव करण्याची सूट देण्यात आली होती. दासप्रथेतून काळ्या नागरिकांना गुलाम म्हणून वागवलं जायचं. त्यामुळे हा लढा सुरुवातीला सरकारच्या पातळीवर कायदा बदलण्यासाठी झाला. मोठ्या संघर्षानंतर हा भेदभाव करणारे कायदे बदलण्यात आले, मात्र त्यानंतरही मोठा काळ महिलांना भेदभावालाच सामोरं जावं लागत होतं.
4. एलजीबीटी मानवाधिकार
एलजीबीटी समुहाच्या मानवाधिकाराचं आंदोलन हे कोणत्याही एका देशाचं नव्हतं. हे आंदोलन जगभरात आपली लैंगिक ओळख स्त्री आणि पुरुष या लिंगापलिकडे असणाऱ्यांचं होतं. अमेरिकेपासून ब्रिटन, युरोप, आशिया आणि आफ्रिकापर्यंत हे आंदोलन झालं. समलैंगिक असणं गुन्हा मानला जात असल्याने अनेकांना तुरुंगात जावं लागलं आणि सामाजिक द्वेषाचाही सामना करावा लागला. मात्र, मोठा काळ झालेल्या या आंदोलनाने आज जगाचा समलैंगिक संबंधांकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. अगदी भारतातही समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर मानलं जात होतं. मात्र, अखेर एलजीबीटी समुहाच्या रस्त्यावरील आणि न्यायालयातील दीर्घ संघर्षानंतर कायद्यात सुधारण करुन समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाली.
5. आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधातील आंदोलन
आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वात झालेलं वर्णभेदाविरोधातील आंदोलन अमेरिकेतील मानवाधिकार आंदोलनानंतरचं आणखी एक मोठं आंदोलन. हे आंदोलन साधारणतः 8 दशकं सुरु होतं. या आंदोलनामुळे आपल्याच देशात दुय्यम वागणुकीचा सामना करणाऱ्या काळ्या आफ्रिकन लोकांना मानवी अधिकार मिळाले.
6. वसाहतीवादी देशांच्या अधिपत्यापासून स्वातंत्र्य मिळवण्याचं आंदोलन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचं स्वातंत्र्यता आंदोलन हे जगातील एकमेव आंदोलन नाही. एक काळ असा होत की आफ्रिका खंडातील जवळपास 90 टक्के देश गोऱ्यांचे गुलाम होते. ब्रिटन, स्पेन आणि फ्रान्स या वसाहतवादी देशांनी अनेक देशांना आपलं गुलाम केलं होतं. अल्जीरिया, अंगोला, केन्या, नामीबिया, जिम्बाब्वे, मोजाम्बिक यासारखे अनेक देशांनी वसाहतवादी देशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दीर्घ आंदोलन केलं. तेव्हा कुठे त्यांना स्वातंत्र्य मिळालं.
7. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीयन देशांमध्ये झालेली आंदोलनं
दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील अनेक देशांवर रशियाचं राज्य होतं. जर्मनी, पोलंड, चेकोस्लावाकिया असे अनेक देश रशियाचे गुलाम देश होते. मोठ्या संघर्षानंतर या देशांना स्वातंत्र्य मिळालं.
8. कमाल अतातुर्क आणि तुर्की आंदोलन
तुर्कीमधील सर्वात मोठ्या विद्यापीठ असलेल्या बोआविची विद्यापीठात विद्यार्थी सध्याच्या उजव्या विचारांच्या तुर्की सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. तुर्की तसा इतर मुस्लीम राष्ट्रांपेक्षा पुढारलेला देश होता. जगात इतर मुस्लीम राष्ट्रांनी जेव्हा सलमान रश्दी यांचं सॅटनिक वर्सेज पुस्तकावर बंदी घातली तेव्हा या पुस्तकावर बंदी न घालणारा तुर्की एकमेव देश होता. तुर्कीने धर्माचा मार्ग न घेता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मार्ग अवलंबला त्याचं कारण असंच मोठं आंदोलन आहे.
9. जॉर्ज फ्लॉयड आंदोलन
मागीलवर्षी मे 2020 मध्ये अमेरिकेतील मिनिपोलिस भागात जॉर्ज फ्लॉयड नावाच्या काळ्या नागरिकाचा गोऱ्या पोलिसांनी अत्याचार केल्यानं मृत्यू झाला. याविरोधात अमेरिकेतील लाखो नागरिकांना ब्लॅक लाईव्हज मॅटर नावाने एक आंदोलन सुरु केलं. तसेच काळ्या रंगाच्या लोकांना देखील जगण्याचा अधिकार असल्याचं सांगत वर्णभेदाला तीव्र विरोध केला. कोरोनाचा काळ असतानाही या आंदोलनाने अमेरिकेला ढवळून काढलं.
10. 2017 चं महिला आंदोलन
टाईम मॅगझीनने इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनांमध्ये 2017 च्या महिला आंदोलनाला स्थान दिलंय. 21 जानेवारी 2017 रोजी हे आंदोलन झालं. ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे आंदोलन झालं. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या. हे आंदोलन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं एकदिवसीय आंदोलन होतं. याआधी कधीही एकाचवेळी इतक्या महिला रस्त्यावर आल्या नव्हत्या. या आंदोलनाचा उद्देश संविधानातील महिलांच्या कायदेशीर अधिकारांचं संरक्षण करणं हा होता. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर महिला अधिकारांना धोका आहे हे याचं मुख्य कारण होतं.
हेही वाचा :
श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी
‘पंतप्रधान आम्हाला घाबरतात, त्यांना हे शोभत नाही’, ‘आंदोलनजीवी’वरुन योगेंद्र यादवांचा घणाघात
जालियन बाग आंदोलनानंतर इंग्रजांनाही कायदा मागे घ्यावा लागला, आज त्याचीच पुनरावृत्ती : जितेंद्र आव्हाड
व्हिडीओ पाहा :
10 most important movements protest of Human history which changed the world