जायचे होते सॅनफ्रान्सिकोला पोहचले रशियात, जेवण औषधांअभावी प्रवाशांचे हाल, एअर इंडीयाने फेरी फ्लाईट पाठवून अखेर केली सुटका
एअर इंडीयाचे दिल्लीहून अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिको येथे निघालेल्या एआय 173 या विमानाचे इंजिन खराब झाल्याने मंगळवारी ते रशियाच्या मगादन शहरातील विमानतळावर मंगळवारी उतरविण्यात आले. त्यांची आज अखेर सुटका झाली.
दिल्ली : एअर इंडीयाच्या ( Air India ) दिल्लीहून सॅनफ्रान्सिको ( San Francisco ) येथे 216 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात अचानक बिघाड झाल्याने त्याला रशियातील आपात्कालिन परिस्थितीत मंगळवारी उतरवावे लागले. परंतू रशियातील एका गैरसोयीच्या ठिकाणी हॉटेलशिवाय प्रवाशांना कित्येक तास उपाशी तसेच औषधाविना त्रास सहन करावा लागला. या अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिकोला नेण्यासाठी अखेर फेरी विमान ( Ferry Flight ) पाठवून एअर इंडीयाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतू रशियन-युक्रेन युद्ध आणि हवाई हद्दीचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.
एअर इंडीयाचे दिल्लीहून अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिको येथे निघालेल्या एआय 173 या विमानाचे इंजिन खराब झाल्याने मंगळवारी ते रशियाच्या उणे 19 ते 38 तापमान असलेल्या अतिपूर्वेकडील कोलिमा प्रातांच्या मगादन शहरातील विमानतळावर मंगळवारी उतरविण्यात आले. त्यामुळे भाषा आणि अन्न भिन्न असलेल्या या देशात जेथे प्रवाशांना रहायला हॉटेल नाही, टॉयलेट नाही, ज्येष्ठांची औषधे संपलेली अशा अवस्थेत कित्येक तास प्रवाशांना काढावे लागले. या विमानातील 216 प्रवासी आणि 16 क्रु यांची मदत करायला या प्रातांत एअरइंडीयाचा एकही प्रतिनिधी नसल्याने प्रवाशांनी आपली व्यथा समाजमाध्यमावर फोटो शेअर करीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तिकीटांचा रिफंड देणार
या प्रकरणी समाजमाध्यमांवर तसेच प्रसारमाध्यमातून बातम्या आल्यानंतर एअर इंडीयाने आपले फेरी विमान एआय 173 डी पाठवून गुरुवारी सकाळी रशियात अडकलेल्या या प्रवाशांना अखेर सॅनफ्रान्सिस्कोला सोडले. एअर इंडीयाने प्रवाशांना इंजिन बिघाडाने झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत तिकीटांचा रिफंड देणार असल्याचे म्हटले आहे.
हवाई हद्दीचा वाद काय ?
रशियाने युक्रेनवर युद्ध लादल्याने रशियावर निर्बंध घालण्यात आल्याने पाश्चात्य देशांना रशियाच्या विमानांना त्यांच्या हवाई हद्दीतून जाण्यास मनाई केल्याने अमेरिका आणि अन्य युरोपीय देशांच्या विमानांना त्यामुळे रशियानेही आपल्या हद्दीतून जाण्यास रशियानेही मग बंदी घातली आहे. रशियाच्या हवाई हद्दीचा वापर सध्या भारत आणि चीन करीत आहे. यामुळे वळसा घालून जायची गरज नसल्याने वेळ वाचत असल्याने विमान प्रवासाचा खर्च कमी होत असल्याने भारताचा फायदा होत आहे. परंतू सॅनफ्रान्सिकोचे विमान असल्याने अमेरिका देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून होती. आता एअर इंडीयाने अखेर मुंबईतून फेरी फ्लाईट पाठवून कित्येक तास अडकलेल्या प्रवाशांची रशियाच्या पोर्ट परिसरातील या गैरसोयीच्या विमानतळावरून गुरुवारी कशी बशी सुटका केली.