29 वर्षीय प्रसिद्ध कोरीयन पॉप गायिका हेसू हीचा मृत्यू, हॉटेलमध्ये सापडला मृतदेह आणि चिट्टी
काही दिवसांपूर्वी कोरीयन गायक मूनबिन याने देखील जीवन संपवित आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. आता कोरीयन सिंगर हेसू हीचा मृतदेह सापडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : कोरीयन के – पॉप बॅंडच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्का आहे. काही दिवसांपूर्वी पॉप – के स्टार सिंगर मूनबिन ( Moonbin ) याने कथितरित्या आपले जीवन संपविल्याची घटना ताजी असतानाच आता के-पॉप आणि प्रसिद्ध कोरीयन गायिका हेसू ( Korean Singer Haesoo ) हीचा अवघ्या 29 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह तिच्या हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या सापडला आहे. साऊथ कोरीयाच्या पोलिसांना ( South Korea ) हॉटेलमध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. हेसू हीच्या धक्कादायक एक्झिटने तिच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
Haesoo तिच्या एका इव्हेंटला पोहचली नाही तेव्हा तिच्या मृ्त्यूबद्दल थांगपत्ता लागला. यावेळी या इव्हेंटच्या आयोजकांनी ती बेपत्ता झाल्याने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा 13 मे रोजी तिचा मृतदेह ती उतरलेल्या एका हॉटेलच्या रुम्स मध्ये पोलीसांना आढळला. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असल्याने तिने आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. परंतू तपासानंतरच खरा प्रकार समजेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.
फॅन्सना मोठा धक्का
गायिका हेसू हीने नेमके असे पाऊल का उचलले याविषयी तिचे चाहते गोंधळात सापडले आहेत. हेसू साऊथ कोरीयाची प्रसिद्ध गायिका होती. तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. हेसूचा जन्म 1993 मध्ये झाला होता. तिने साल 2019 मध्ये आपल्या करीयरला सुरूवात केली. हेसू हीचा पहीला आल्बम ‘माय लाईफ, मी’ होता. तिला सर्वाधिक प्रसिद्धी The Trot Show मुळे मिळाली.
मूनबिनची आत्महत्या
19 एप्रिल रोजी पॉप सिंगर मूनबिनचा मृतदेह गंगनम जवळ त्यांच्या घरात आढळला होता. अवघ्या 25 व्या वर्षी मूनबिन याचा देखील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. हे प्रकरणही संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या प्रकरणाचाही तपास सुरू केला होता. परंतू अखेर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.