सोन्याची AK-47, डायमंड नेकलेस, सौदी प्रिन्सचे घड्याळ आणि… नेमका काय झोल केलाय इमरान खान यांनी?
सत्ता गेली, पद गेलं आता जेलमध्ये जावं लागणार; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान चांगलेच अडकले आहेत.
इस्लामाबाद : सत्ता गेली, पद गेलं यानंतर आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर आता जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे. पंतप्रधान पदावरून पाय उतार झाल्यानंतर इम्रान खान यांची खासदारकीही रद्द झाली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात इमरान खान चांगलेच अडकले आहेत. त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. सोन्याची AK-47, डायमंड नेकलेस, सौदी प्रिन्सचे घड्याळ या भेटवस्तु चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ईसीपी) माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना झटका देणारा निर्णय दिला आहे. इमरान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.
तोशाखाना अर्थात तिजोरी प्रकरणी ईसीपीने इम्रान खान यांना भ्रष्ट व्यवहारांसाठी दोषी ठरवले आहे. इम्रान खान आता संसद सदस्य नसल्याचे ईसीपीने जाहीर केले आहे.
आता ईसीपी इम्रान खान यांच्याविरुद्ध भ्रष्ट व्यवहारांसाठी कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणात लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इम्रान खान यांच्यावर सत्तेत असताना परदेशी नेत्यांकडून भेटवस्तू मिळाल्या होत्या. या मौल्यवान आणि अत्यंत महागड्या भेट वस्तुंबाबत अधिकाऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
14.2 कोटींचे गिफ्ट्स 4 कोटींमध्ये मिळवले
14.2 कोटी रुपयांच्या 112 भेटवस्तू इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी केवळ 4 कोटी रुपये देऊन पाकिस्तान सरकारच्या तिजोरीतून हडप केल्या होत्या.
जगातील विविध देशांनी इम्रान खान यांना रोलेक्सच्या सात घड्याळांसह इतर महागडी घड्याळे, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, महागडे पेन, सोन्याच्या कफ लिंक्स, अंगठ्या, लाखो रुपयांच्या डिनर सेटपासून परफ्यूमसह अनेक भेटवस्तू होत्या.
इम्रान खान यांनी या भेटवस्तू सरकारी तोशाखान्यात जमा न करता स्वत:कडे ठेवल्या होत्या. यातील सर्वात महागडे गिफ्ट म्हणजे सोनेरी रोलेक्स घड्याळ. पाकिस्तान सरकारने त्याची किंमत 8 कोटी 50 लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. हे घड्याळ 18 सप्टेंबर 2018 रोजी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी इम्रान खान यांना दिले होते.
सौदीच्या राजपुत्रानेही इम्रान खान यांना सोन्याचा मुलामा असलेली AK 47 बंदुक भेट दिली होती. पाकिस्तान सरकारच्या नोंदीनुसार तोशाखान्यात या रायफलची कोणतीही नोंद नाही.
सरकारने तोशाखाना भेटवस्तू आणि त्यांच्या कथित विक्रीतून मिळालेल्या पैशांचे तपशील शेअर न केल्याबद्दल इम्रान खान विरोधात याचिका दाखल केली होती.
मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय पीठाने या प्रकरणावर निर्णय जाहीर केला. इम्रान यांनी या प्रकरणी खोटे विधान केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असे न्यायालयाने म्हंटले आहे.