हा देश अंतराळात अण्वस्र तैनात करण्याच्या तयारीत, गुप्त अहवाल उघड झाल्याने अमेरिकेला आले टेन्शन
अंतराळात आता स्पर्धा वाढली असून येथून पुढे अंतराळातही युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. कारण एकमेकांचा उपग्रह पाडून सर्व संदेशवहन इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पाडून युद्ध जिंकण्याची मानसिकता आता जगातील सुपरपॉवर देश करु लागले आहेत. यातच सिक्रेट अहवालात अंतराळात एण्टी सॅटेलाईट अण्वस्र तैनात करण्याची तयारी सुरु असल्याचे उघड झाले आहे.
नवी दिल्ली | 15 फेब्रुवारी 2024 : जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे नेहमी म्हटले जाते. आता महाशक्तींमध्ये सुरु असलेली अण्वस्र स्पर्धा आता अंतराळात पोहचली आहे. जगामध्ये सध्याच्या घडीला इतकी अण्वस्र आहेत की आपल्या पृथ्वीचा कित्येकदा विध्वंस होऊ शकतो असे म्हटले जाते. आता अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या गुप्त समितीचे रिपब्लिकन अध्यक्ष माईक टर्नर यांनी बुधवारी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी अमेरिकेसह जगाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचा प्रतिस्पर्धी देश रशिया अंतराळात अण्वस्र तैनात करु इच्छीत आहे असे या इशाऱ्यात म्हटले आहे.
एकीकडे रशियाचे युक्रेनशी युद्ध सुरु आहे. त्यामुळे रशियावर अनेक देशांनी निर्बंध घातले आहेत. त्याच आता रशियाला अंतराळात अण्वस्र तैनात करायची असल्याचा गुप्त अहवालात उघडकीस आले आहे. त्यामुळे अमेरिकेला हादरा बसला आहे. या धोक्याची सर्व माहीती सार्वजनिक केली जावी आणि त्यामुळे कॉंग्रेस, प्रशासन आणि आमचे सहकारी या संकटाला उत्तर द्यायला उचलण्यात येणाऱ्या पावलांविषयी मोकळेपणाने चर्चा करु शकू असे अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या गुप्त समितीचे रिपब्लिकन अध्यक्ष माईक टर्नर यांनी म्हटले आहे.
माईक टर्नर यांचा युक्रेन दौरा
माईक टर्नर अलिकडेच युक्रेनला गेले होते. युक्रेनमध्ये द्विदलीय कॉंग्रेस प्रतिमंडळाचे ते नेतृत्व त्यांनी केल्यानंतर माईक टर्नर आता परतले आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकारी खासदारांना सावधान करीत रशियन हल्ल्याच्या विरोधातील युद्धात आता युक्रेनसाठीचा वेळ संपत चालला आहे. टर्नर हे अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षेचे सर्मथक राहीले आहेत. त्यांनी रशिया आणि युक्रेन युद्धात अमेरिकेने सैन्य मदत पुरविण्याच्या बाजूने नेहमीच पाठींबा दिला आहे.
अंतराळात रशियन एण्टी- सॅटेलाईट शस्रास्रांचा धोका आहे. अशा प्रकारे सॅटेलाईट विरोधी क्षेपणास्रांचा पुढे रशिया गैरवापरही करू शकेल अशी भीती व्यक्त होत आहे. दर तासाला अब्जावधी डाटा ट्रान्समिट करणारे अमेरिकन सॅटेलाईट धोक्यात सापडले आहेत. अशा प्रकारचे सॅटेलाईट विरोधी शस्रे अमेरिकेचे सॅटेलाईट देखील पाडण्यासाठी रशिया त्याचा वापरू शकते असे म्हटले जात आहे. हा धोका अंतराळात रशियन एण्टी सॅटेलाईट शस्रास्र तैनाती संबंधिचा असल्याचे अमेरिकन हाऊस स्पीकर माईक जॉनसन यांनी म्हटले आहे. रशिया स्पेस बेस्ड एण्टी सॅटेलाईट अण्वस्र विकसित करण्याच्या तयारीत असल्याचे गुप्त अहवाल असल्याचे याआधी न्यूयॉर्क टाईम्सने देखील म्हटले होते.
अमेरिकेला चीन आणि रशियाकडून धोका
अलिकडेच अमेरिकेने चीन आणि रशियाच्या अंतराळातील सॅटेलाईट्सना धोकादायक ठरविले होते. अंतराळात वाढती स्पर्धा पाहून अमेरिकेने 2019 साली स्पेस फोर्सची स्थापना केली होती. अमेरिकेच्या अंतराळ रणनीतीमुळे पेंटागनने म्हटले आहे की चीन आणि रशियाने काऊंटर स्पेस क्षमतांचा आक्रमक विकास केल्याने अंतराळातील संघर्ष वाढीस लागला आहे. त्यामुळे युद्धजन्य धोका वाढला असल्याचेही अमेरिकन पेंटागनने नमूद केले आहे.